नवरात्र महोत्सव- सहावी माळ; श्री विठ्ठलास अलंकार, रूक्मिणी मातेस पारंपरिक कमलादेवी पोषाखासह अलंकार परिधान

घटस्थापनेपासून नवरात्र महोत्सवास सुरवात झाली आहे, या निमित्त दरवर्षी प्रथा परंपरेप्रमाणे सहाव्या दिवशी श्री विठ्ठल व माता रुक्मिणीला पारंपरिक पोषाखासह अलंकार परिधान करण्यात आले आहेत. त्यामध्ये रूक्मिणी मातेस कमलादेवी पोषाख परिधान करण्यात आला असल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक प्रविणकुमार घम यांनी दिली.

श्री विठ्ठलास सोन्याचा मुकुट, कौस्तुभ मणी, दंडपेठ जोड, हिऱ्याचे कंगनजोड, बालाजी नाम, मोत्याची कंटी एक पदरी, मोत्याची कंठी दोन पदरी, मोत्याचा तुरा, मारवाडी पेट्याचा मोत्याचा हार, मस्त्य जोड, तोडेजोड, तुळशीची माळ तीन पदरी, तुळशीची माळ एक पदरी, शिरपेच मोठा, शिरपेच मोठा दहा लोक असलेला इत्यादी प्रकारचे अलंकार परिधान करण्यात आलेले आहेत.

तसेच रुक्मिणी मातेस सोन्याचा मुकुट, जडावाचा हार, खड्यांची वेणी, चिंचपेटी हिरवी, तन्मणी मोठा, सरी लहान, सूर्य मोत्याचा कंठा, बाजीराव गरसोळी, पेठयांची बिंदी, मन्यामोत्याच्या पाटल्या जोड, मोत्याचे मंगळसूत्र, सोन्याचे बाजूबंद, मस्त्य जोड, रूळ जोड, पंजन जोड, मोठी नथ, कर्णफुले जोड, तारामंडळ, सोन्या मोत्याचे ताणवाड जोड इत्यादी प्रकारचे अलंकार परिधान करण्यात आलेले आहेत.

तसेच राधिका मातेस नक्षी टोप, पुतळ्यांची माळ, मोहरांची माळ, जवेची माळ, चिंचपेटी तांबडी, ठुशी व सत्यभामा देवीला सिद्धेश्वर टोप, जवेची माळ, जवमणी पदक, हायकोल, पुतळ्यांची माळ इत्यादी प्रकारचे अलंकार परिधान करण्यात आलेले आहेत, तसेच *महालक्ष्मी* मातेस सोन्याचे गंठण, मोत्याची कंटी एक पदरी, इमिटेशन नेकलेस, दंडपेट्या जोड, चंद्रहार १५ पदरी, एकदानि, जवेची माळ दोन पदरी, तोरडी जोड, राणीहार, लॉकेट, चांदीचे छत्री इत्यादी अलंकार परिधान करण्यात आलेले आहे.

श्री व्यंकटेशस चांदीचा मुकुट, लॉकेट, गोफ मोठा, अष्टपैलू मोत्याची तीन पदरी, तांदळा हार सात पदरी, मोहरांची माळ, पैंजण रोड, मोठी बोरमाळ तीन पदरी, साखळ्या जोड, लक्ष्मी हार इत्यादी अलंकार परिधान करण्यात आलेले आहे.

तसेच मंदिर समितीच्या अखत्यारीत असलेल्या पंढरपूर शहर व परिसरातील लखुबाई, अंबाबाई, पद्मावती, यल्लमादेवी, यमाई-तुकाई माता आदी परिवार देवतांना देखील पारंपारिक पोषाख करण्यात येत असल्याचे कार्यकारी अधिकारी श्रीकांत यादव यांनी सांगीतले.

Comments are closed.