युक्रेनच्या ड्रोन हल्ल्यांमुळे रशियाच्या अनेक भागांत इंधनाची टंचाई; पुतिन यांची कबुली, पण…
युक्रेनकडून सतत होणाऱ्या ड्रोन हल्ल्यांमुळे रशियाच्या ऊर्जा सेवांवर परिणाम झाला असून अनेक भागांत इंधनाची टंचाई निर्माण झाली आहे, अशी कबुली रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी रविवारी दिली. मात्र, हे अडथळे नियंत्रणात आणण्यासारखे आहेत असा दावा करत त्यांनी युक्रेन विरोधातील लष्करी मोहीम सुरूच ठेवणार असल्याचे सांगितले.
एका मुलाखतीत बोलताना पुतिन म्हणाले की, तेल शुद्धीकरण कारखाने आणि इंधनाच्या ठिकाणांवर झालेल्या हल्ल्यांमुळे पुरवठ्याची आव्हाने निर्माण झाली आहेत, परंतु रशियाच्या कारवाया यामुळे थांबणार नाहीत. ‘सर्वसाधारणपणे महत्त्वाच्या पायाभूत सुविधांवर आणि विशेषतः ऊर्जा पायाभूत सुविधांवर होणाऱ्या हल्ल्यांचा विचार केला तर, आमच्या पायाभूत सुविधांवर होणाऱ्या या हल्ल्यांमुळे समस्या निर्माण होत आहेत, हे उघड आहे,’ असे पुतिन म्हणाले. ‘सध्या आम्हाला काही प्रमाणात टंचाई जाणवत आहे, परंतु ती गंभीर नाही.’ अलिकडच्या आठवड्यात युक्रेनने रशियाच्या औद्योगिक आणि ऊर्जा सेवांवर ड्रोन हल्ले तीव्र केले आहेत. क्रास्नोडार आणि यारोस्लाव्हलसह इतर भागांतील रिफायनरीज आणि इंधन साठवणूक केंद्रांना लक्ष्य केले जात असतानाच त्यांचे हे वक्तव्य आले आहे.
इंधन पुरवठ्यासाठीचे उपाय सुरू आहेत
पुतिन म्हणाले की, देशभरात, विशेषतः क्रिमिया आणि शेती क्षेत्रासाठी पुरेसा इंधन पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी सरकारने एक टास्क फोर्स स्थापन केला आहे. देशांतर्गत मागणीला प्राधान्य देण्यासाठी अधिकारी डिझेलच्या निर्यातीवर तात्पुरती बंदी घालण्याचा विचार करत असल्याचेही त्यांनी सांगितले. पुतिन यांनी अधिकाऱ्यांना सांगितले की, ‘चालक आणि व्यावसायिकांसाठी समस्या अजूनही कायम आहेत, याची तुम्हाला चांगलीच कल्पना आहे. दुर्दैवाने, अजूनही पेट्रोल पंपांवर रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत’. नागरी आणि ऊर्जा पायाभूत सुविधांवर होणाऱ्या युक्रेनियन ड्रोन हल्ल्यांचा प्रभाव कमी करण्यासाठी त्यांनी रशियाची हवाई संरक्षण यंत्रणा मजबूत करण्याचे आवाहनही केले.
हल्ले कमी करण्याचा प्रस्ताव पुतिन यांनी फेटाळला
शांततेच्या दिशेने जाण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून युक्रेनने लांब पल्ल्याचे हल्ले मर्यादित करण्याचा प्रस्ताव दिला होता, असे पुतिन यांनी सांगितले; परंतु हा प्रस्ताव युक्रेनियन सैन्यावरील दबाव कमी करण्याच्या उद्देशाने होता, असा युक्तिवाद त्यांनी केला. ‘हा प्रस्ताव का दिला जात आहे हे स्पष्ट आहे, प्रत्युत्तर म्हणून आमच्याकडून युक्रेनच्या हद्दीत दूरवर होणारे आमचे हल्ले खूप शक्तिशाली आहेत, त्यांचा जास्त प्रभाव पडतो आणि खरे सांगायचे तर ते अधिक विध्वंसक आहेत’, असे पुतिन म्हणाले. ‘त्यांच्याकडे सैनिकांची कमतरता आहे, युक्रेनच्या सैन्याला बहुधा असे वाटत आहे की हा प्रस्ताव त्यांचा बचाव करू शकतो. परंतु कीव्ह सरकारला वाचवणे हा आमच्या योजनेचा भाग नाही’, असे त्यांनी पुढे स्पष्ट केले.
टंचाई दूर करण्यासाठी उपाय सुरू आहेत
रशियाच्या देशांतर्गत इंधन बाजारात स्थिरता आणण्यासाठी सरकार डिझेल निर्यातीवर संभाव्य बंदीसह अनेक उपाययोजनांचा विचार करत असल्याचे पुतिन यांनी सांगितले, परंतु कोणताही निर्णय घेताना तेल उत्पादकांसाठी नवीन समस्या निर्माण होणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे यावर त्यांनी भर दिला. रशियाच्या ऊर्जा मंत्रालयाने तातडीने डिझेल निर्यातीवर बंदी न घालण्याचा सल्ला दिला असला तरी, अधिकारी या परिस्थितीचा पुन्हा आढावा घेतील अशी अपेक्षा असल्याचे ‘ब्लूमबर्ग’च्या अहवालात म्हटले आहे.
उपपंतप्रधान अलेक्झांडर नोव्हाक यांनी देखील सांगितले की, पेट्रोलवरील शून्य आयात-शुल्क दर वाढवायचा की नाही याचा निर्णय सरकार पुढच्या आठवड्यात घेईल, तसेच देशांतर्गत इंधन पुरवठ्याला बाधा पोहोचणार नाही एवढ्याच प्रमाणात निर्यात सुरू ठेवली जाईल.
Comments are closed.