तुंबाड २ बघण्यासाठी पुढच्या वर्षापर्यंत प्रतीक्षा; चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर
हिंदुस्थानच्या सिनेसृष्टीमध्ये लोककथांवर आधारित हॉरर चित्रपटांचा ट्रेंड सुरू झाला तो तुंबाड या चित्रपटाच्या माध्यमातून. आता या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची काही दिवसांपूर्वीच घोषणा झाली आणि या चित्रपटाचे शूटींगही सुरू झाले आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी आता चित्रपट प्रदर्शनाची तारीख जाहीर करुन चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. पुढच्या वर्षी ३ डिसेंबर २०२७ रोजी ‘तुंबाड २’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ‘तुंबाड २’ सिक्वेलमध्ये पौराणिक कथा त्याच्या जोडीला थरार यांचा अनोखा संगम पाहायला मिळणार आहे.
‘तुंबाड २’ संदर्भात बोलताना निर्माते सोहम शाह म्हणाले, हा चित्रपट नेहमीच माझ्यासाठी खास राहिला आहे. आगामी सिक्वेलच्या माध्यमातून प्रेक्षकांना अधिक सखोलपणे कथेतील नवनवीन गोष्टींचा उलगडा होणार आहे. राही अनिल बर्वे दिग्दर्शित आणि सोहम शाह निर्मित ‘तुंबाड’ हा चित्रपट पहिल्यांदा २०१८ मध्ये प्रदर्शित झाला होता. मात्र, त्यावेळी त्याला हवा तसा प्रतिसाद मात्र मिळाला नव्हता. त्यानंतर निर्मात्यांनी २०२४ मध्ये तो पुन्हा प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आणि यावेळी चित्रपटाने, विशेषतः ‘देवरा’ आणि ‘स्त्री २’ सारख्या चित्रपटांशी स्पर्धा करूनही चांगले यश मिळवले. ₹१४ कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने जगभरात ₹५२.२५ कोटींची कमाई केली होती.
‘तुंबाड २’ या चित्रपटातील काही भाग हा मुंबईत शुटींग करण्यात येणार असून, याकरता मुंबईत एका शहरासारखा दिसणारा ७-८ एकरांचा भव्य सेट उभारण्यात आला आहे. ‘तुंबाड २’ चे दिग्दर्शन आदेश प्रसाद यांनी केले असून, अभिनेता-निर्माता सोहम शाह यांनी त्यांच्या ‘सोहम शाह फिल्म्स’ या बॅनरखाली निर्मिती केली आहे. तर या चित्रपटाचे वितरण पेन मरुधर करणार आहेत.
Comments are closed.