संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
बीड : जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh deshmukh) यांच्या हत्याकांडामध्ये वाल्मिक कराड (walmik karad) हाच मुख्य सूत्रधार असल्याचा युक्तिवाद मुंबई उच्च न्यायालयाच्या (Highcourt) औरंगाबाद खंडपीठातील मुख्य सरकारी वकिलांनी केला आहे. आपला या हत्याकांडाशी संबंध नसून गोवण्यात आल्याचा युक्तिवाद करीत कराडच्या वतीने खंडपीठात जामीन अर्ज दाखल करण्यात आला आहे. मात्र, सरकारी वकिलांनी बाजू मांडताना वाल्मिक कराड हाच सूत्रधार असल्याचे सांगितले. आता, या प्रकरणाची उर्वरीत सुनावणी 16 डिसेंबर रोजी होणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या मिहीर शहा निवाड्यानुसार आरोपीला अटकेची कारणे लेखी देणे बंधनकारक असताना कराडला कारणे दिलेली नाहीत, मोक्का कायदा चुकीच्या पद्धतीने लावला गेला आहे आणि देशमुख हत्याकांडात कराडचा संबंध नसून तो घटनेच्या दिवशी शेकडो किलोमीटर दूर होता. त्याला प्रकरणात गोवल्याचा युक्तिवाद बचाव पक्षाच्यावतीने करण्यात आला. त्यावर, सराकारी वकील ॲड. अमरजितसिंह गिरासे यांनी प्रत्येक तारखेनुसार घटनाक्रम तपशीलवार उलगडून दाखवला. या घटनेतील साक्षीदार, मोबाईल फोन संवादाच्या तपशीलाचा (सीडीआर) अहवाल, सीसीटीव्ही फुटेज, ध्वनिफित मुद्रण, न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा अहवाल न्यायालयात दाखविण्यात आला.
या सगळ्या पुराव्यांवरुन वाल्मिक कराड हाच मुख्य सूत्रधार असल्याचा युक्तिवाद गिरासे यांनी केला. कराडने अवादा कंपनीला दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली होती, यासह सुदर्शन घुलेचे कंपनीच्या कर्मचाऱ्याला मारहाण करणे, आदी घटनाक्रम विस्तृतपणे मांडला. सुदर्शन घुलेने देशमुख यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणानंतर कराड याने आपल्या मागणीच्या आड येणाऱ्या देशमुखला आडवा करा, असा आदेश दिला. त्यानुसार सुदर्शन घुले आणि त्याच्या सहकाऱ्यांनी उमरी टोलनाक्यावरुन संतोष देशमुख यांचे अपहरण केले. त्यांना निर्जन जागी नेऊन नृशंस मारहाण केली. ही मारहाण सुरू असताना वाल्मिक कराड, विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांच्यात फोनवर बोलणे सुरू होते. त्यासाठी, कराड हाच मारेकऱ्यांना निर्देश देत होता, अशी बाजू गिरासे यांनी उच्च न्यायालयाच्या खंडपीठात मांडली.
बीडमध्ये पुढील सुनावणी 19 डिसेंबरला
दरम्यान, दुसरीकडे बीड सत्र न्यायालयातही सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी सुरू असून आज तीन तास कोर्टात युक्तिवाद झाला. याप्रकरणी, पुढील सुनावणी 19 डिसेंबर रोजी होणार आहे. दिवसभरात तब्बल तीन तास न्यायालयाचे आज कामकाज पार पडले. सरकारी पक्षाकडून आजच आरोप निश्चितीबाबत जोरदार युक्तिवाद करण्यात आला. मात्र, आरोपीच्या वकिलांना सरकारी पक्षाकडून काही पुरावे आणि कागदपत्रांची पूर्तता न झाल्याने वेळ वाढवून मागण्यात आला. न्यायालयाने दोघांचे म्हणणे ऐकून पुढील सुनावणी 19 डिसेंबर रोजी दिली आहे.
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.