रशियासोबत युद्धाची भीती, पोलंड सोनं विकून शस्त्र खरेदी करण्याच्या तयारीत
युरोपमध्ये पुन्हा एकदा मोठ्या युद्धाचे ढग घोंगावू लागले आहेत. रशियासोबत असलेल्या जुन्या वैमनस्यामुळे आणि वाढत्या धोक्यामुळे पोलंड सरकारने आपल्या राखीव साठ्यातील सोनं विकून आधुनिक शस्त्रे खरेदी करण्याची तयारी सुरू केली आहे. रशियाची नजर पोलंडवर असून, संभाव्य धोका ओळखून पोलंड सरकार आता आपल्या संरक्षणासाठी कठोर पावले उचलण्याच्या विचारात आहे, असे वृत्त टीव्ही९ भारतवर्षने दिले आहे.
पोलंड सध्या जगातील सोन्याच्या साठ्याबाबत ११ व्या क्रमांकावर असून त्यांच्याकडे ५५० टन सोनं उपलब्ध आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत हा साठा ७०० टनांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट असून, याच सोन्याचा वापर करून संरक्षणासाठी निधी उभा करण्याचा प्रस्ताव तयार केला जात आहे. ‘फायनान्शिअल टाइम्स’च्या माहितीनुसार, मार्च महिन्यात पोलंडच्या केंद्रीय बँकेच्या गव्हर्नरनी या योजनेचे संकेत दिले होते. मात्र पोलंडच्या अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे की, यावर सध्या केवळ चर्चा सुरू असून अंतिम निर्णय झालेला नाही. शस्त्र खरेदीसाठी पोलंडला साधारण ४७ बिलियन डॉलरच्या अतिरिक्त निधीची गरज आहे. जो युरोपीय देशांकडून कर्ज घेऊन किंवा स्वतःचे सोने विकूनच उभा केला जाऊ शकतो.
रशियाने आतापर्यंत पोलंडवर थेट आक्रमण केले नसले तरी, युक्रेन युद्धादरम्यान अनेक रशियन क्षेपणास्त्रे पोलंडच्या सीमेत पडली आहेत आणि दोन्ही देशांमधील सायबर युद्धही शिगेला पोहोचले आहे. फेब्रुवारी २०२६ मध्ये पोलंड सरकारने आपल्या नागरिकांना भविष्यातील मोठ्या युद्धाच्या शक्यतेबाबत इशारा देऊन सज्ज राहण्यास सांगितले होते. रशियाचे पुढील लक्ष्य पोलंड असू शकते, असे काही ठोस पुरावे पोलंडला मिळाले आहेत, असे बोलले जाते. त्यामुळे आता पोलंड कोणतीही जोखीम न पत्करता आपली लष्करी ताकद वाढवण्यावर भर देत आहे.
Comments are closed.