केडीएमसी आयुक्तांसह सात अधिकाऱ्यांचे वॉरंट रद्द; दाव्याच्या सुनावणीस गैरहजर, पाच हजारांचा बाँड भरला
दाव्याच्या सुनावणीस सतत गैरहजर असल्याने केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांच्यासह सात अधिकाऱ्यांना आज न्यायालयाने चांगलाच दणका दिला. त्यांच्याविरुद्ध बेलेबल वॉरंट काढण्यात आले होते. पण या अधिकाऱ्यांनी प्रत्येकी पाच हजार रुपयांचा बाँड भरल्याने हे वॉरंट रद्द केले असून उद्या १७ एप्रिल रोजी कल्याण कोर्टात सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
केडीएमसी क्षेत्रात राहणारे इंद्रमणी उपाध्याय यांच्या डोंबिवली व कल्याणमधील मालमत्तेवर रस्ता रुंदीकरणामुळे परिणाम झाला होता. त्याबदल्यात पालिकेने नुकसानभरपाई तसेच टीडीआर स्वरूपात मोबदला द्यावा, अशी त्यांनी प्रशासनाकडे मागणी केली. पण त्यावर कोणतीही कार्यवाही न झाल्याने उपाध्याय यांनी पालिकेविरोधात २०१९ मध्ये कोर्टात दावा दाखल केला होता.
कल्याण कोर्टात दाव्याच्या सुनावणीदरम्यान आयुक्त अभिनव गोयल यांच्यासह उपायुक्त वंदना गुळवे, प्रसाद बोरकर, बाळासाहेब चव्हाण, शहर अभियंता अनिता परदेशी, नगररचनाकार संतोष डोईफोडे हे वारंवार गैरहजर राहिले. त्यामुळे न्यायालयाने या सर्वांविरुद्ध थेट वॉरंट बजावले होते. अखेर या अधिकाऱ्यांनी पाच हजार रुपयांचा बाँड भरल्याने त्यांच्याविरुद्धचे वॉरंट रद्द झाले. उद्या कल्याण कोर्टात सर्व अधिकारी हजर राहणार असून सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.
Comments are closed.