वॉशिंग्टनमध्ये डिनरदरम्यान गोळीबार, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प सुरक्षित, हल्लेखोराला अटक

अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डी.सी. येथे शनिवारी रात्री मोठी खळबळ उडाली. व्हाइट हाऊस कॉरेस्पॉन्डेंट्स असोसिएशन डिनर दरम्यान अचानक गोळीबार झाला. वॉशिंग्टन हिल्टन येथे सुरू असलेल्या या उच्चस्तरीय कार्यक्रमात राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सहभागी होणार होते. या प्रकारामुळे सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, संशयित हल्लेखोराला ताब्यात घेण्यात आले आहे.

या कार्यक्रमाला ट्रम्प यांच्यासोबत त्यांच्या पत्नी मेलानिया ट्रम्प आणि उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स उपस्थित होते. गोळीबाराचे आवाज ऐकताच युनायटेड स्टेट्स सीक्रेट सर्व्हिसच्या जवानांनी क्षणाचाही विलंब न लावता ट्रम्प यांना घेरले आणि मंचावरून सुरक्षित बाहेर काढले. त्याचवेळी उपराष्ट्राध्यक्ष, मेलानिया ट्रम्प आणि मंत्रिमंडळातील सदस्यांनाही तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले.

गोळीबाराचा आवाज मुख्य सभागृहाच्या वरच्या मजल्यावरून आल्याची माहिती मिळताच संपूर्ण हॉलमध्ये एकच गोंधळ उडाला. काही क्षणांपूर्वी शांतपणे सुरू असलेला कार्यक्रम अचानक भीतीच्या छायेत गेला. सुमारे २,६०० पाहुण्यांपैकी अनेकांनी जीव वाचवण्यासाठी टेबलखाली आश्रय घेतला, तर काही सेवक घाबरून धावत सुटले. पत्रकार आणि इतर लोकांमध्येही भीतीचे वातावरण पसरले.

सुरक्षा यंत्रणांनी तात्काळ हालचाल करत संपूर्ण हॉटेल रिकामे केले आणि परिसराला कडेकोट सुरक्षा कवच दिले. घटनास्थळीच संशयित हल्लेखोराला पकडण्यात आले असून त्याची सखोल चौकशी सुरू आहे. दरम्यान, बाहेरूनही मोठ्या प्रमाणात सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

या घटनेनंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’ या सामाजिक माध्यमावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, “आजची संध्याकाळ अनपेक्षित आणि गोंधळाची ठरली. मात्र सीक्रेट सर्व्हिस आणि सुरक्षा यंत्रणांनी अतिशय धैर्याने आणि तत्परतेने परिस्थिती हाताळली. हल्लेखोराला पकडण्यात आले आहे. पुढील निर्णय सुरक्षा यंत्रणांच्या सल्ल्यानुसार घेतला जाईल. ही संध्याकाळ अपेक्षेप्रमाणे राहिली नाही आणि कार्यक्रम पुन्हा आयोजित करावा लागेल.”

दरम्यान, ट्रम्प आणि मेलानिया ट्रम्प यांना सुरक्षितपणे राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानी हलवण्यात आले आहे. सध्या या संपूर्ण घटनेचा तपास सुरू असून, सर्व व्हिडीओ आणि पुरावे तपासले जात आहेत.

Comments are closed.