आम्ही इराणविरुद्ध लष्करी कारवाईसाठी तयार, इस्रायली लष्करप्रमुखांचा इशारा
अमेरिका आणि इराण यांच्यात शांतता चर्चांना वेग आला असतानाच, इस्रायलने इराणला पुन्हा एकदा थेट आणि कडक इशारा दिला आहे. ‘गरज पडल्यास इराणविरुद्ध कोणत्याही क्षणी आणि मोठ्या प्रमाणावर लष्करी कारवाई सुरू करण्यासाठी इस्रायली लष्कर पूर्णपणे सज्ज आहे,’ असा इशारा इस्रायलचे लष्करप्रमुख जनरल अयाल जमीर यांनी दिला आहे. २४ मे २०२६ रोजी उत्तर कमांडमधील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेताना ते बोलत होते. इराणची लष्करी ताकद कमकुवत करणे हेच आमचे प्रमुख उद्दिष्ट असून, जोपर्यंत गरज आहे तोपर्यंत लष्कर आपली पूर्ण तयारी आणि लवचिकता कायम ठेवेल, असेही ते म्हणाले. एबीपी न्यूजने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
सिन्हुआ वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, अमेरिका आणि इराण यांच्यात युद्धविराम पुढे नेण्यासाठी आणि होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली करण्याबाबत चर्चा सुरू आहे. मात्र इराणच्या अणुकार्यक्रमावरून दोन्ही देशांमध्ये अद्यापही मतभेद कायम आहेत. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या सुरक्षा मंत्रिमंडळाची बैठकही रविवारी संध्याकाळी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. लष्करप्रमुख जमीर यांनी असेही सांगितले की, इस्रायली लष्कर लेबनॉनमध्ये हिजबुल्लाविरुद्ध सातत्याने कारवाई करत आहे. लष्कर प्रत्येक स्तरावर हिजबुल्लाला लक्ष्य करत आहे. एप्रिलमध्ये इस्रायल आणि लेबनॉन यांच्यात युद्धविरामाची घोषणा झाली होती, परंतु असे असूनही इस्रायली लष्कर अद्याप दक्षिण लेबनॉनमधून पूर्णपणे मागे हटलेले नाही. हिजबुल्लाचे तळ आणि त्यांच्या सैनिकांना लक्ष्य करून आपण दररोज हल्ले करत असल्याचे इस्रायलचे म्हणणे आहे.
‘इराणचा अण्वस्त्रांचा धोका संपुष्टात आणणे आवश्यक’ असल्याचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी रविवार सांगितले. इराणशी संबंधित कोणत्याही अंतिम करारात अण्वस्त्रांचा धोका पूर्णपणे नष्ट करणे आवश्यक असेल, यावर त्यांचे आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे एकमत झाले आहे. नेतन्याहू यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिले की, त्यांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली करण्याशी संबंधित करार आणि इराणच्या अणुकार्यक्रमावर होणाऱ्या आगामी चर्चेबाबत संवाद साधला. यावेळी इस्रायलच्या सुरक्षेप्रती ट्रम्प यांच्या वचनबद्धतेबद्दल नेतन्याहू यांनी त्यांचे आभार मानले.
Comments are closed.