आम्हाला कंपनीतून कोणतीही तक्रार प्राप्त झाली नाही, नाशिक चौकशीच्या पार्श्वभूमीवर TCS चे स्पष्टीकरण
नाशिकमध्ये TCS युनिट मध्ये धर्मांतर आणि लैंगिक गैरवर्तनाच्या आरोपांबाबत पोलीस चौकशी सुरू झालेली आहे. याच पार्श्वभूमीवर ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’ ने शुक्रवारी स्पष्ट केले की, या संदर्भात त्यांना कोणतीही तक्रार प्राप्त झालेली नाही. नाशिक युनिटशी संबंधित नोंदींच्या प्राथमिक आढाव्यावरून असे दिसून येते की, सध्या जे आरोप केले जात आहेत, त्या स्वरूपाची कोणतीही तक्रार आम्हाला ‘POSH’लैंगिक छळ प्रतिबंधक अंतर्गत माध्यमांतून प्राप्त झालेली नाही,” असे आता कंपनीने म्हटले आहे. कंपनीने आपल्या अंतर्गत चौकशीसाठी एका देखरेख समितीची स्थापना करण्याची आणि या प्रक्रियेत बाह्य संस्थांचाही सहभाग करून घेण्याची घोषणा केली आहे.
निवेदनानुसार वित्त क्षेत्रातील अनुभवी जाणकार आणि कंपनीच्या संचालक मंडळावरील स्वतंत्र संचालक, केकी मिस्त्री हे या देखरेख समितीचे अध्यक्षपद भूषवतील. पोलिसांनी या प्रकरणी सात कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. यामध्ये सहा पुरुष आणि एका महिला एचआर प्रमुख यांचा समावेश आहे. आणखी एक कर्मचारी निदा खान ही मात्र अद्याप फरार आहे.
एनडीटीव्हीने दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण तेव्हा उघडकीस आले, जेव्हा एका महिलेने तिचा सहकारी दानिश शेख याच्यावर गंभीर आरोप केले. महिलेच्या म्हणण्यानुसार, दानिशने २०२२ मध्ये लग्नाचे खोटे आश्वासन देऊन तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते—विशेष म्हणजे, त्यावेळी तो आधीच दुसऱ्या एका महिलेशी विवाहबद्ध होता.
लैंगिक अत्याचार आणि सक्तीच्या धार्मिक धर्मांतराच्या या प्रकरणाशी संबंधित असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना TCS ने निलंबित केले आहे. पोलिसांच्या अहवालानुसार, निदा खान ही दानिश शेखची बहीण आहे. अहवालात नमूद केल्याप्रमाणे, तिने तक्रारदार महिलेवर अपमानजनक शेरेबाजी केली आणि तिला धर्म बदलण्यासाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला.
पुढे असाही आरोप करण्यात आला आहे की, खान आणि आणखी एक व्यक्ती, तौसीफ अख्तर यांनी तक्रारदार महिलेपासून ही वस्तुस्थिती लपवून ठेवली होती की, दानिश शेखचे आधीच दुसऱ्या एका महिलेशी लग्न झाले होते. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू करताच, आणखी सात महिला पुढे आल्या. त्यांनी असा दावा केला की, त्यांच्या वरिष्ठ सहकाऱ्यांनी त्यांचा मानसिक आणि लैंगिक छळ केला होता. त्याचबरोबरीने एचआर विभागाने, त्यांच्या तक्रारींकडे तक्रारींकडे दुर्लक्ष केले होते.
या घटना फेब्रुवारी २०२२ ते मार्च २०२६ या कालावधीत घडल्याचे सांगितले जात आहे. TCS मधील आरोपी निदा खानचा पोलीस शोध घेत आहेत. शुक्रवारी, नाशिक पोलीस गुन्हे शाखेचे एक पथक निदाचा ठावठिकाणा शोधण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथे दाखल झाले. त्यांनी निदाच्या घरी जाऊन तिच्या पतीकडे तिच्या सध्याच्या ठिकाणाबाबत चौकशी केली जात आहे.
TCS ने आपल्या निवेदनात हे देखील स्पष्ट केले आहे की, खान ही ना HR व्यवस्थापक आहे, ना ती भरती प्रक्रियेसाठी जबाबदार आहे. ती केवळ प्रोसेस असोसिएट म्हणून कार्यरत होती. शिवाय तिच्याकडे कोणत्याही प्रकारचे अधिकार किंवा जबाबदाऱ्या नव्हत्या. लैंगिक अत्याचार आणि सक्तीने धर्मपरिवर्तन करण्याच्या या प्रकरणाशी संबंधित असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना TCS ने निलंबित केले आहे. कंपनीने ठामपणे सांगितले आहे की, अशा पद्धतीने केलेले कोणतेही गैरवर्तन कंपनीकडून खपवून घेतले जाणार नाही. या प्रकरणात कंपनीकडून पोलिसांना तपासात पूर्णपणे सहकार्य करत आहेत.
टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी लैंगिक छळाच्या या प्रकाराला अत्यंत चिंताजनक आणि वेदनादायी असे संबोधले. वस्तुस्थिती पडताळून पाहण्यासाठी आणि या घडलेल्या परिस्थितीला जबाबदार असलेल्या व्यक्तींना ओळखण्यासाठी कंपनीच्या अंतर्गत स्तरावर सखोल चौकशी सुरू असल्याचे त्यांनी जाहीर केले.
Comments are closed.