युद्ध थांबवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू!
नरेंद्र मोदी यांचे पोलंडचे पंतप्रधान टस्क यांना आश्वासन
पोलंडशी तांत्रिक सहकार्य वाढविणार
- भारत आणि पोलंड यांच्यात उच्च तंत्रज्ञान विकासासाठी सहकार्य होणार
- 2030 पर्यंत परस्पर व्यापारात आत्ताच्या दुपटीने वाढ करण्याचा निश्चय
- पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड टस्क यांच्यात संरक्षण सहकार्याचीही चर्चा
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध थांबविण्यासाठी भारत निश्चितच प्रयत्न करेल, असे महत्त्वपूर्ण आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोलंडचे पंतप्रधान डोनाल्ड टस्क यांना दिले आहे. टक्स यांच्या भारत दौऱ्याचा प्रारंभ गुरुवारपासून झाला आहे. दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचे गुरुवारी स्वागत करण्यात आले. नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्याशी द्विपक्षीय संबंधांवर चर्चा केली. चर्चेनंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त निवेदन प्रसिद्ध करुन चर्चेसंबंधी माहिती दिली. रशिया आणि युक्रेन यांच्यात गेली अनेक वर्षे य्द्धु होत आहे. कोणत्याही समस्या युद्धाने सुटत नाहीत.
त्या सामोपचार आणि चर्चेतूनच सुटतात, ही भारताची प्रारंभापासूनची भूमिका आहे. भारताने रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांना युद्धापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे. यापुढेही युद्ध थांबविण्यासाठी कोणताही व्यवहार्य प्रस्ताव आल्यास भारत या प्रस्तावाचा पाठपुरावा करेल आणि युद्ध थांबविण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करेल, असे प्रतिपादन पंतप्रधान मोदी यांनी टस्क यांच्याशी चर्चा करताना दिले. टस्क यांनी समाधान व्यक्त केले. दोन्ही नेत्यांनी व्यापार, गुंतवणूक, संरक्षण आणि तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये परस्पर भागीदारी आणि सहकार्य कसे वाढविता येईल याविषयी विस्तृत चर्चा केली आहे.
संरक्षण सहकार्यात रस
भारताशी संरक्षण क्षेत्रात सहकार्य करण्यास पोलंड इच्छुक आहे. पोलंडने मोठ्या प्रमाणात अत्याधुनिक संरक्षण तंत्रज्ञान विकसित केले आहे. त्यामुळे पोलंडमधील संरक्षण साधननिर्मिती कारखाने भारतातील कारखान्यांशी भागीदारी करण्यास उत्सुक आहेत. भारतालाही या भागीदारीचा लाभ होईल. संरक्षण साधनांची भारताची आवश्यकता मोठी आहे. त्यामुळे सहकार्य होऊ शकते. या संबंधातही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टस्क यांच्याशी त्यांच्या भेटीत चर्चा केल्याचे वृत्त आहे.
युरोपातील प्रगत देश
पोलंड हा युरोपातील एक प्रगत आणि मोठा देश मानला जातो. त्याचा स्थूल राष्ट्रीय उत्पन्न विकास दर 3.6 टक्के असून तो युरोपमधील अनेक देशांपेक्षा अधिक आहे. यंदाच्या आर्थिक वर्षात आम्ही युरोपच्या उत्पादनात आणि संपत्तीत भर घालणार आहोत, असे प्रतिपादन पोलंडमधील उच्चपदस्थांनी दौऱ्यापूर्वी केले.
व्यापार दुप्पट करणार
भारत आणि पोलंड या देशांमध्ये सध्या प्रतिवर्ष जितका व्यापार होतो, तो 2030 पर्यंत दुप्पट वाढविण्याचे ध्येय ठरविण्यात आले आहे. भारत आणि युरोपियन महासंघ यांच्यात मुक्त व्यापार करार झाला आहे. मात्र, अद्याप या कराराला युरोपियन महासंघाच्या अनेक देशांच्या लोकप्रतिनिधीगृहांनी मान्यता दिलेली नाही. ही मान्यता देण्याची औपचारिक प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण केली जावी, अशी मागणी दोन्ही नेत्यांनी संयुक्त निवेदनात केली. या कराराचे कार्यान्वयन त्वरित झाल्यास भारत आणि युरोपियन महासंघ यांच्यासाठी व्यापाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार असून परस्पर लाभाच्या दृष्टीने करार महत्वाचा आहे.
पोलंडच्या कंपन्यांना आवाहन
भारतात व्यवसायवृद्धी आणि उत्पादनासाठी कधी नव्हे इतके अनुकूल वातावरण सध्या आहे. त्याचा लाभ पोलंडच्या कंपन्यांनी उठवावा. भारतात त्यांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करावी. भारतात उच्चशिक्षित आणि कौशल्यवान तंत्रज्ञांची संख्या मोठी आहे. पोलंडच्या कंपन्यांना त्यांचा लाभ होऊ शकतो. पोलंडच्या कंपन्यांनी भारतात वस्तूउत्पादन करावे आणि या वस्तू जगाच्या बाजारपेठांमध्ये निर्यात कराव्यात, असे महत्वपूर्ण आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवेदनात केले आहे. भारत-पोलंड उद्योग व्यासपीठाच्या स्थापनेसंबंधी दोन्ही नेत्यांनी समाधान व्यक्त केले. उच्च डिजिटल तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञान यांच्या विकासात एकमेकांना साहाय्य करण्याचा निर्धारही दोन्ही नेत्यांनी चर्चा होत असताना केला,
Comments are closed.