बंगाल निवडणुकीत वापरलेले 4000 EVM जळून खाक, सरकारी इमारतीला आग, घातपाताचा संशय
कोलकाता: पश्चिम बंगालची (West Bengal) राजधानी कोलकातामधून एक अत्यंत धक्कादायक आणि राजकीय वर्तुळात खळबळ माजवणारी घटना समोर आली आहे. कोलकाता येथील एका नऊ मजली सरकारी इमारतीला लागलेल्या भीषण आगीत तब्बल 4000 ईव्हीएम (EVM) जळून खाक झाल्या आहेत. या ईव्हीएम विधानसभा निवडणुकीत वापरण्यात आल्या होत्या. या घटनेनंतर राजकीय वातावरणात आरोप-प्रत्यारोपांना उधाण आलं असून, प्रशासनानं या प्रकरणी गुन्हा (FIR) दाखल करून तपास सुरू केला आहे.
दक्षिण कोलकात्याच्या अलीपूर (Alipore) भागात असलेल्या एका सरकारी इमारतीला बुधवारी (10 जून) आग लागली होती. ही आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाच्या जवानांना तब्बल 24 तासांपेक्षा जास्त वेळ लागला.
West Bengal Assembly Elections : विधानसभा निवडणुकीत EVM वापर
ज्या नऊ मजली इमारतीला आग लागली, त्यामध्ये इतर सरकारी विभागांशिवाय दक्षिण 24 परगणा जिल्हा परिषदेचं कार्यालय देखील भक्ष्यस्थानी पडलं. बंगाल सरकारमधील अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा राज्यमंत्री कौशिक चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या आगीत सुमारे 4,000 ईव्हीएम पूर्णपणे नष्ट झाल्या आहेत.
विशेष म्हणजे, या जळालेल्या ईव्हीएम मशिन्सचा वापर नुकत्याच राज्यात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांदरम्यान 10 वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये करण्यात आला होता. या मशिन्स तिथे सुरक्षेसाठी ठेवण्यात आल्या होत्या.
Kolkata EVM Fire Suspicious Incident : मंत्र्यांकडून घातपाताचा संशय
घटनेची माहिती मिळताच राज्यमंत्री कौशिक चौधरी यांनी तातडीने घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी या अपघातावर मोठा संशय व्यक्त केला. ही कोणतीही सामान्य आग वाटत नाही. यामध्ये काही घातपात किंवा तोडफोड झाली आहे का, याचा आम्ही सखोल तपास करत आहोत. आग सर्वात आधी इमारतीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर लागली होती, मग ती थेट नवव्या आणि दहाव्या मजल्यापर्यंत कशी पोहोचली, हे अद्याप अस्पष्ट आहे, असं चौधरी यांनी म्हटलं.
EVM Warehouse Fire Updates : 24 तासांनंतर आग आटोक्यात, कूलिंगचे काम सुरू
बुधवारी लागलेल्या या भीषण आगीच्या ज्वाळा गुरुवारी सकाळपर्यंत शांत झाल्या होत्या. खबरदारीचा उपाय म्हणून अग्निशमन दलाचे अधिकारी आणि जवान अजूनही घटनास्थळी तैनात असून, इमारतीमध्ये कूलिंगची प्रक्रिया राबवली जात आहे.
पश्चिम बंगालमधील बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर थेट विधानसभा निवडणुकीतील ईव्हीएम मशिन्स जळाल्याने या प्रकरणाला आता मोठे राजकीय वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
ही बातमी वाचा :
अभिजीत दिपके झुरळ जनता पार्टी पीसी : आता मी एक नाही, लाखो तरुण माझ्यासोबत आहेत : अभिजीत दिपके
Comments are closed.