वेस्ट इंडिजची 401 धावांची भागीदारी वर्ल्ड रेकॉर्ड मोडण्यात ठरली फेल, जाणून घ्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोच्च भागीदारी

कसोटी क्रिकेटमध्ये बऱ्याच कालावधीनंतर ४०० धावांची भागीदारी पाहायला मिळाली आहे. श्रीलंकेचा संघ सध्या वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आहे. यामध्ये टी२० आणि वनडे मालिका खेळून झाल्यानंतर २ सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरूवात झाली आहे. यातील पहिला सामना ऍंटिग्वामध्ये खेळला जात असून या सामन्यादरम्यान वेस्ट इंडिजचे अमीर जांगू आणि कर्णधार रॉस्टन चेज यांच्यात ४०० धावांची भागीदारी झाली. मात्र तरीही ते कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोच्च भागीदारीचा विक्रम मोडण्यात अपयशी ठरले. तर जाणून घेऊ कसोटीमधील सर्वोच्च भागीदारी.

चेज-जांगू यांच्यात झालेली ४०१ धावांची भागीदारी कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सहाव्या विकेटसाठीची सर्वोच्च भागीदारी ठरली. शाय होपच्या दुखापतीमुळे संघात अचानक स्थान मिळालेल्या २८ वर्षीय जांगूने क्रिकेटच्या इतिहासात कायम स्मरणात राहील अशा पद्धतीने संधीचे सोने केले. आपला केवळ दुसरा कसोटी सामना खेळणाऱ्या जांगूने श्रीलंकेच्या गोलंदाजांची धुलाई केली. यादरम्यान जांगूने द्विशतक केले, मात्र चेजचे द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकले.

जांगूने ३७३ चेंडूंचा सामना करत १९ चौकार आणि ३ षटकारांसह २३३ धावा केल्या. याबरोबरच तो ब्रायन लारा आणि ख्रिस गेल यांच्यानंतर श्रीलंकेत कसोटीत द्विशतक झळकावणारा तिसरा वेस्ट इंडिज क्रिकेटपटू ठरला. त्याने चेजसोबत केलेली भागीदारी वेस्ट इंडिजच्या कसोटी इतिहासातील दुसरी सर्वोच्च भागीदारी ठरली. याआधी १९५८ मध्ये गॅरी सोबर्स आणि कॉनरॅड हंट यांनी पाकिस्तानविरुद्ध दुसऱ्या विकेटसाठी ४४६ धावांची भागीदारी केली होती. तसेच कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सहाव्या विकेटसाठीची ही सर्वोच्च भागीदारी ठरली असताना दोघांनी २०१६ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध बेन स्टोक्स आणि जॉनी बेअरस्टो यांनी केलेल्या ३९९ धावांच्या भागीदारीला मागे टाकले.

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वोच्च भागीदारीचा विश्वविक्रम श्रीलंकेचे दिग्गज कुमार संगकारा आणि माहेला जयवर्धने यांच्या नावावर आहे. त्यांनी २००६ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ६२४ धावांची भागीदारी केली होती. गेल्या २० वर्षांत कोणत्याही जोडीला हा विक्रम मोडता आलेला नाही. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ही भागीदारी केली होती. त्या सामन्यात जयवर्धनेने ३७४ धावा तर संगकाराने २८७ धावा केल्या होत्या.

वेस्ट इंडिज विरुद्ध श्रीलंका सामन्याची स्थिती पाहिली तर श्रीलंकेने पहिल्या डावात ३०८ धावा केल्या. वेस्ट इंडिजने पहिल्या डावात ९ विकेट्स गमावत ६२६ धावा केल्या. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला असून श्रीलंकेचा दुसरा डाव सुरू आहे. त्यामध्ये त्यांनी एक विकेट गमावत १५ धावसंख्या केली आहे.

Comments are closed.