पश्चिम रेल्वेची तिकीट तपासणी मोहीम सुस्साट, एप्रिल ते ऑगस्ट दरम्यान 100 कोटींहून कमाई
विना तिकीट प्रवासाला आळा घालण्यासाठी पश्चिम रेल्वेने तिकीट मोहीम तीव्र केली आहे. मुंबई उपनगरीय लोकल गाड्या, लांब पल्ल्याच्या मेल/एक्सप्रेस गाड्या, पॅसेंजर गाड्या आणि सुट्टीकालीन विशेष गाड्यांमध्ये सखोल तिकीट तपासणी मोहीम राबवली. या मोहिमेअंतर्गत पश्चिम रेल्वेच्या तिकीट तपासनीसांनी चालू आर्थिक वर्षात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. एप्रिल ते ऑगस्ट 2026 या कालावधीत पश्चिम रेल्वेने तब्बल 100.42 कोटी रुपयांचा दंड वसूल केला.
पश्चिम रेल्वेने 13.47 लाख विनातिकीट आणि अनियमित प्रवाशांवर कारवाई केली. केवळ ऑगस्ट 2026 मध्ये, 2.13 लाखांहून अधिक विनातिकीट आणि अनियमित प्रवासी आढळले, ज्यातून 17.16 कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. वातानुकूलित उपनगरीय लोकल गाड्यांमध्येही विशेष तिकीट तपासणी मोहीम सुरू आहे.
एप्रिल ते ऑगस्ट 2026 या कालावधीत, वातानुकूलित उपनगरीय सेवांमध्ये सुमारे 78,600 दंडात्मक प्रकरणे आढळून आली आणि त्यातून 3.26 कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. गेल्या वर्षीच्या याच कालावधीत सुमारे 36,480 प्रकरणांतून 1.20 कोटी रुपये वसुली केली होती; त्या तुलनेत ही वाढ जवळपास 172 टक्के इतकी आहे.
Comments are closed.