आग कशामुळे लागली? अधिकार्‍यांची गुपचिळी, २४ तास उलटले तरी कारण अस्पष्ट

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

अग्निशमन दलाच्या जवानासह एका सुरक्षारक्षकाचा बळी घेणाऱ्या गावदेवी भाजी मंडईतील अग्निकांड नेमके कशामुळे घडले? याबाबत २४ तास उलटले तरी पालिकेला ठोस कारण सांगता आलेले नाही. पालिकेच्या कारभाराचे वाभाडे काढणाऱ्या या महत्त्वाच्या प्रश्नावर प्रशासनाने गुपचिळी घेतली असून एकही अधिकारी तोंड उघडायला तयार नाही. त्यामुळे या दुर्घटनेनंतर तरी प्रशासनाला जाग येईल का, असे खडेबोल सुनावतानाच अग्नी सुरक्षेविषयीच्या नियमांचे काटेकोर पालन केले जाईल का, असा सवाल ठाणेकरांनी केला आहे.

ठाण्याच्या गोखले रोडवरील गावदेवी भाजी मंडईला गुरुवारी पहाटे भीषण आग लागून मोठी दुर्घटना घडली. या घटनेत अग्निशमन दलाचे जवान सागर शिंदे आणि सुरक्षारक्षक काळू गाडेकर यांचा गुदमरून मृत्यू झाला. या मंडईच्या अग्निकांडात दोन जीव गेल्यानंतर पालिकेच्या कारभारावर चोहोबाजूंनी टीका होऊ लागली आहे. भाजी विक्रेत्यांसाठी उभारण्यात आलेल्या मंडईत प्रत्यक्षात कपडे, चप्पल आणि इतर व्यवसाय सुरू असल्याचे समोर आले आहे. याबाबत अनेकांनी वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने कानाडोळा करून वर्षानुवर्षे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे पालिकेचे दुर्लक्ष आणि बेकायदा व्यवसाय वापर बदल आगीस कारणीभूत ठरल्याची चर्चा रंगू लागली आहे.

Comments are closed.