बाऊन्सर, गनमॅनच्या गराड्यात फिरणारा ठकसेन जेरबंद, नामांकित बिल्डर, वकील आणि निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांनाही गंडा
मी खूप मोठा फायनान्सर आहे, एका फोनवर कोट्यवधी रुपयांचे कर्ज मंजूर करून देतो, अशी बतावणी करत बाऊन्सर आणि खाजगी गनमॅनचा ताफा घेऊन डोंबिवलीत दराबा निर्माण करणाऱ्या निखिल भोईर (३०) या भामट्याचा विष्णूनगर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. नामांकित बिल्डर, वकील तसेच निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांना मोठ्या कर्जाचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या या आरोपीला पोलिसांनी अटक केली असून त्याच्या इतर साथीदारांचा शोध सुरू आहे.
एका नामांकित बिल्डराला व्यवसायासाठी २५ कोटी रुपयांच्या कर्जाची आवश्यकता होती. निखिल याने त्याला १०० टक्के कर्ज मंजूर करून देतो अशी हमी दिली होती. त्यासाठी कर्जाच्या रकमेच्या सव्वा टक्के म्हणजेच तब्बल २८ लाख ७५ हजार रुपये अॅडव्हान्स कमिशन म्हणून जमा करण्याची अट घातली. त्या बिल्डरचा विश्वास संपादन करण्यासाठी त्याने त्याला पाच कोटी रुपयांचा धनादेशही दिला. परंतु तो धनादेश बँकेत वटला नाही आणि आपली फसवणूक झाल्याचे बिल्डरच्या लक्षात आले. त्यानंतर या बिल्डरने विष्णूनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. वरिष्ठ निरीक्षक राम चोपडे आणि पोलीस निरीक्षक गहिनीनाथ गमे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे त्यांनी निखिल भोईर याला डोंबिवलीतून अटक केली.
दाखवून वर्चस्व
निखिल भोईर याने अत्यंत चतुरपणे फसवणुकीची मोड्स ऑपेरेंडी तयार केली. त्याने स्वतः भोवती बाऊन्सर्स आणि गनमॅनचा गराडा उभा केला. पंचतारांकित हॉटेल्समध्ये कर्जासाठी गरजू असलेल्या बड्या लोकांच्या बैठका तो घेत असे. माझे वरपर्यंत लागेबंधे आहेत असा आव आणून तो समोरील व्यक्तीवर मानसिक दबाव निर्माण करत असे. त्याच्या या खोट्या बडेजावाला भुलून अनेक सुशिक्षित आणि प्रतिष्ठित व्यक्तींनी लाखो रुपये गमावल्याची माहिती समोर आली आहे. प्राथमिक तपासात बिल्डरच नव्हे तर काही वकील आणि निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांनाही त्यांनी फसवल्याचे उघड झाले.
Comments are closed.