मुली स्वस्त झाल्यात का?, हगवणे प्रकरणानंतर कायद्यात काय बदल केले सांगा…; दीप्ती मगरच्या मृत्य
पुणे: पुण्यात गेल्या काही महिन्यांमध्ये सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितांनी टोकाचं पाऊल उचलत आपलं आयुष्य संपवल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. या सर्वात चर्चेत आली ती म्हणजे वैष्णवी हगवणे केस, तिलाही तिच्या सासरी मानसिक आणि शारिरीक त्रासाला सामोरं जावं लागलं, त्यानंतर तिने घरातच आपल्या चिमुकल्या मुलाला मागे सोडून आत्महत्या केली, त्यानंतर आता पुण्यात सासरच्या जाचाला कंटाळून इंजिनियर विवाहितेने आत्महत्या केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. उरुळीकांचन (Pune Crime News) जवळील सोरतापवाडीमधील ही घटना आहे. आत्महत्या केलेल्या विवाहितेची सासू ही भाजप पक्षातून सरपंच आहे तर सासरे शिक्षक असल्याची माहिती आहे. उरुळीकांचन पोलिसांनी याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल केला (Pune Crime News) आहे. दीप्ती मगर (Dipti Magar Death)चौधरी असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. तिने २५ तारखेला संध्याकाळी तिने घरातच आपल्या तीन वर्षाच्या मुलीसमोर या विवाहीतेने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.(Pune Crime News) या प्रकरणानंतर आज राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी मृत दिप्तीच्या आई वडीलांची भेट घेतली, यावेळी काही महिला या चाकणकरांवरतीच भडकल्याचं दिसून आलं.(Dipti Magar Death)
रुपाली चाकणकरांवर महिला भडकल्या. त्यावेळी त्यांनी वैष्णवी हगवणे प्रकरणांनंतर काय कायद्यात बदल केले असा सवालही उपस्थित केला, जर तेव्हाच कायद्यात बदल केले असते तर आज आमची मुलगी गेली नसती म्हणत संतापलेल्या माहिलांनी महिला आयोगावर ताशेरे ओढले, मुली स्वस्त झाल्यात का? कायद्याने आम्ही सगळे जात आहोत, असंही यावेळी महिलांनी म्हटलं आहे.
महिलांनी चाकणकरांसमोर उपस्थित केले सवाल
वैष्णवी हगवणे प्रकरणाला सात महिने झाले, तुमच्या पदावर ताशेरे ओढले गेले, तुम्ही कायद्यात काय बदल केला? आज आमच्या मगर फॅमिलीतील मुलगी या प्रकरणात बळी गेली आहे. तेव्हा तुमच्या पदावरतीही आलं होतं, आम्हालाही वाईट वाटलं होतं, त्यानंतर तुम्ही कायद्यात काय बदल केला? असा सवाल महिलांनी उपस्थित केला आहे.
तर दिप्तीच्या आई वडिलांची भेट घेतल्यानंतर रुपाली चाकणकर म्हणाल्या, बाई म्हणून लढतो आणि आई म्हणून मागे पडतो. आपण सोनं का देतो? २५ वर्षापूर्वी मला आणि नारळ एवढच सासरी दिलं, मी तशीच गेले. हे भक्षक आहेत. मुलींना सांगितलं पाहिजे आम्ही आहोत, एवढं दिवस हे सगळं तुम्हाला माहिती होतं मग तेव्हा तुम्ही का तक्रार दिली नाही. कायद्याच्या भाषेत सगळं व्हायला हवं होतं.
माझ्याकडे रोज केस येतात, कायदा स्ट्राँग आहे. आपण कमी पडतोय. ६ वर्ष आपण सहन केलं, तेव्हा तक्रार दिली असती तर आज दीप्ती वाचली असती, आपण कमी पडतो असंही चाकणकरांनी म्हटलं आहे.
हगवणे प्रकरणानंतर कायद्यात काय बदल केले सांगा…; दीप्ती मगरच्या मृत्यूनंतर रुपाली चाकणकरांवर महिला भडकल्या, नेमकं काय घडलं?#वैष्णविहगवणे #रुपालीचाकणकर #दीप्तीमार #punenews pic.twitter.com/pcCtggtvnN
— अंकिता शांतीनाथ खाणे (@KhaneAnkita) 27 जानेवारी 2026
आम्ही महिला संसार इतका काटकासरीने करतो, बाजारात गेल्यावर कोथिंबिरीच्या जुडीचा भाव चारवेळा बोलून कमी करत असतो. इथे लग्नाच्या बाजारात मुलगी उभी असते तेव्हा तिच्यासाठी लिलाव मांडतो की काय, अशी परिस्थिती असते. आपण सहजासहजी त्या गोष्टी स्वीकारतो. मुलगी सासरी पाठवतो तेव्हा सासरच्या मंडळींनी मुलीबरोबर लग्न केलंय की आपल्या पैशासाठी लग्न केलंय, हा प्रश्न पडतो. अशी विकृत माणसे समजाता वावरत असतात. त्यांची भूक कधीच भागणारी नसते. सासरी नांदणाऱ्या प्रत्येक मुलीला आवर्जून सांगा, तुला सासरी त्रास होत असेल तर माहेरचे दरवाजे तुझ्यासाठी कायम उघडे आहेत, तू कधीही ये. तुझ्या लढ्यात आम्ही समर्थन देऊ, असंही रूपाली चाकणकरांनी म्हटलं आहे.
आणखी वाचा
Comments are closed.