राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाचं पुढे काय? जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले, ‘ते नेते आता..

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवारांचा पक्ष (NCP Ajit Pawar) आणि शरद पवार (Sharad Pawar) गटाच्या संभाव्य विलीनीकरणाबाबत गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. विशेषतः उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) यांच्या विमान अपघाती मृत्यूनंतर या चर्चेला अधिकच वेग आला होता. दोन्ही गटांतील नेत्यांमध्ये बैठका झाल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र यावेत, अशी इच्छा अजित पवार यांची होती, असे दावे शरद पवार गटातील काही नेत्यांकडून सातत्याने केले जात होते. त्याचबरोबर त्यांच्या बैठकीचे व्हिडीओ देखील समोर आले होते, मात्र अजित पवार गटातील नेते तसेच पक्षाच्या नवी अध्यक्ष सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी या विषयावर स्पष्ट भूमिका मांडलेली नव्हती. विलीनीकरणाबाबत दावे-प्रतिदावे, शक्यता आणि अटकळी यामुळे राजकीय वातावरण तापले होते. दरम्यान, या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार जयंत पाटील (Jayant Patil) यांनी  विलीनीकरणाच्या मुद्द्यावर स्पष्टपणे भाष्य करत आता या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.

NCP Murger: विलीनीकरणाची चर्चा आता पूर्णपणे थांबलेली आहे

विलनीकरणाची चर्चा आता नाही, विलीनीकरणाची चर्चा आता पूर्णपणे थांबलेली आहे. (आधी) ज्यांच्यासोबत विलीनीकरणाची चर्चा सुरू होती, ते नेते (अजित पवार) आता हयात नाहीत. दोन्ही पक्षांचं विलीनीकरण व्हावं, याची सुरवात अजित पवार यांच्याकडून सुरु झाली होती. मात्र आता ते या जगात नाहीत. त्यामुळे आत्ता दोन पक्षांचं विलीनीकरण होणार नाही, असं जयंत पवार यांनी स्पष्टपणे सांगितलं. इतर दोन पक्षांना सुद्धा हे माहिती झालं आहे, असंही ते म्हणाले. त्यांच्या या विधानामुळे खळबळ माजली असून विलीनीकरणाला पूर्णविराम मिळाला का, अशी चर्चा सुरू झाली आहे.

MVA: शरद पवार यांनी दिल्लीत जावं

त्याचबरोबर जयंत पाटील यांनी राज्यसभेच्या महाविकास आघाडीच्या एका जागेबाबत बोलताना सांगितलं की, काल आम्ही उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. आमच्या पक्षातील सर्वांचं म्हणणं आहे की, शरद पवार यांनी दिल्लीत जावं. आम्ही काँग्रेस आणि ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत एकत्रित बसून निर्णय घेणार आहोत. यासंदर्भातील चर्चा सुरु आहे. आदित्य ठाकरे यांचं म्हणणं बरोबर आहे, अजून कुठलाही निर्णय झालेला नाही. आमच्या पक्षाची भूमिका आहे की शरद पवार यांनी राज्यसभेवर जावं. महाविकास आघाडी मिळून निर्णय घेणार आहे, असे सुतोवाच जयंत पाटलांनी केले आहेत.

आणखी वाचा

Comments are closed.