घाऊक महागाई दर ९.९२ टक्के.
अन्नधान्य अन् इंधनाच्या किमतीमुळे चिंता वाढली
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
ऑगस्ट महिन्यात घाऊक महागाई दर वाढून 9.92 टक्के राहिला आहे. जुलै महिन्यातील 9.78 टक्क्यांच्या तुलनेत हे प्रमाण अधिक आहे. अन्नधान्य, उत्पादित सामग्री आणि इंधन तसेच विजेच्या वाढत्या किमतींनी या वृद्धीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. देशात महागाईचा दबाव सातत्याने वाढत असून यामुळे सर्वसामान्यांच्या खिश्याला थेट झळ पोहोचत आहे.
वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने घाऊक महागाई निर्देशांकाचे आकडे सोमवारी जारी केले. ऑगस्ट महिन्यात खाद्य महागाईत वाढ होत प्रमाण 7.05 टक्के झाले आहे. जुलै महिन्यात हे प्रमाण 6.65 टक्के राहिले होते. उत्पादित सामग्रीचा घाऊक महागाई दर 8.37 टक्क्यांच्या उच्चाकी स्तरावर पोहोचला आहे. जुलै महिन्यात हे प्रमाण 8.29 टक्के होते. इंधन आणि विजेचा घाऊक महागाई आधारित महागाई दर 22.93 टक्के नोंदविला गेला आहे. या प्रमुख क्षेत्रांमध्ये किमतीत तीव्र वृद्धी दिसून आली आहे.
पश्चिम आशियात सुरू असलेले युद्ध आणि होर्मुझ सामुद्रधुनीतील नाकाबंदीमुळे जागतिक स्तरावर कच्च्या तेलाचे दर कडाडले आहेत. भारतात बहुतांश कच्चे तेल याच सामुद्रधुनीच्या मार्गाने आयात केले जाते. जागतिक कच्च्या तेलासोबत खतांच्या किमतीतही वाढ झाली आहे. या वाढत्या खर्चाचा व्यापक प्रभाव अन्नधान्याच्या किमतींवरही पडला आहे. या जागतिक घटनांमुळे देशात महागाईचा दबाव वाढत आहे.
घाऊक महागाई दर दीर्घकाळापर्यंत वाढलेला राहिल्याने बहुतांश उत्पादनक्षेत्रावर याचा प्रतिकूल प्रभाव पडतो. घाऊक महागाई दर अधिक राहिल्यास उत्पादक याचा भार ग्राहकांवर टाकत असतात. सरकार केवळ करांच्या माध्यमातून घाऊक महागाई निर्देशांकाला नियंत्रित करू शकतात. परंतु करकपात एका मर्यादेपर्यंत करता येऊ शकते.
Comments are closed.