अखेर 15 वर्षांनंतर ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’चा सिक्वेल येणार? झोया अख्तरने दिली मोठी अपडेट

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ या लोकप्रिय चित्रपटाच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. 2011 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर वेगळीच छाप पाडली होती. हृतिक रोशन, फरहान अख्तर आणि अभय देओल या त्रिकुटाची मैत्री, स्पेनमधील रोड ट्रिप आणि आयुष्य मनमुरादपणे जगण्याचा संदेश आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. आता तब्बल 15 वर्षांनंतर या चित्रपटाचा सिक्वेल येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आज तक ने दिलेल्या वृत्तानुसार दिग्दर्शिका झोया अख्तरने स्वतः ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा 2’बाबत एक मोठी अपडेट दिली आहे. ‘द हॉलीवूड रिपोर्टर इंडिया’शी बोलताना झोयाने सांगितले की, या चित्रपटाच्या सिक्वेलवर काम सुरू आहे. लेखिका आणि चित्रपट निर्माती रीमा कागतीदेखील या प्रोजेक्टमध्ये सहभागी आहे. झोयाने स्पष्टपणे सांगितले, “आम्ही त्यावर काम करत आहोत.” मात्र, याचा अर्थ ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा 2’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, असे नाही. झोयाने या प्रोजेक्टबाबत महत्त्वाची अटही स्पष्ट केली आहे. 15 वर्षांनंतर या चित्रपटातील पात्रांना पुन्हा मोठ्या पडद्यावर आणण्यासाठी कथा योग्य आणि प्रभावी असणे आवश्यक आहे, असे तिचे म्हणणे आहे.

झोयाच्या मते, केवळ पहिला चित्रपट लोकप्रिय झाला म्हणून त्याचा सिक्वेल बनवण्याची तिची इच्छा नाही. आजच्या काळात या पात्रांना पुन्हा सादर करण्यासाठी योग्य वाटेल अशी कथा मिळणे महत्त्वाचे आहे. अशी कथा तयार करता आली तरच हा चित्रपट पुढे नेला जाईल. त्यामुळे सिक्वेल नक्की बनणार की नाही, याबाबत सध्या कोणतीही अधिकृत निश्चितता नाही.

2011 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’मध्ये हृतिक रोशन, फरहान अख्तर आणि अभय देओल यांनी अनुक्रमे अर्जुन, इम्रान आणि कबीर ही पात्रे साकारली होती. कतरिना कैफ आणि कल्की कोचलिन यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या. झोया अख्तर आणि रीमा कागती यांनी या चित्रपटाचे लेखन केले होते, तर फरहान अख्तरने निर्मितीची जबाबदारी सांभाळली होती. चित्रपटाला प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला होता.

Comments are closed.