सूर्यकुमार यादव नाही तर कोण असणार भारतीय संघाचा पुढचा कर्णधार? 'या' नावाकडे सर्वांचे लक्ष!
सूर्यकुमार यादवच्या (Suryakymar Yadav) नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2026 चा आयसीसी टी-20 विश्वचषक जिंकण्यात यश मिळवले. टीम इंडिया पुन्हा एकदा विश्वविजेती बनली असली, तरी खुद्द कर्णधाराची बॅट मात्र अपेक्षेप्रमाणे तळपली नाही. सध्या सूर्याची बॅट शांत असून त्याच्या फॉर्मवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. याच दरम्यान, सूर्याला कर्णधारपदावरून हटवले जाऊ शकते अशा चर्चांना उधाण आले आहे. आता प्रश्न असा आहे की, भारताचा पुढचा कर्णधार कोण असेल?
सूर्यकुमार यादव सध्या धावा बनवण्यासाठी झगडत आहे. त्याने दिल्ली कॅपिटल्स (DC) विरुद्ध 51 धावांची खेळी केली, पण त्यानंतर त्याच्या बॅटमधून मोठ्या धावा आलेल्या नाहीत. विशेष म्हणजे, सूर्या स्वस्तात बाद होत नाहीये. त्याला चांगली सुरुवात मिळत आहे, पण त्या सुरुवातीचे रूपांतर तो मोठ्या खेळीत करू शकत नाही. यामुळे त्याची टीम पराभूत तर होतच आहे, पण तो स्वतः देखील टीकेचा धनी होत आहे. यामुळेच सोशल मीडियावर त्याला कर्णधारपदावरून हटवण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. सूर्यकुमार कर्णधार राहणार की नाही, याचा अंतिम निर्णय बीसीसीआय (BCCI) आणि निवड समिती घेईल. पण जर बदल झालाच, तर नवा कर्णधार कोण?
काही लोक हार्दिक पांड्याचे (Hardik pandya) नाव घेत आहेत, पण याची शक्यता कमी वाटते. मुंबई इंडियन्सची (MI) सध्याची अवस्था पाहता, त्याच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणे कठीण आहे. हार्दिकने पूर्वी भारताचे नेतृत्व केले आहे, पण नंतर त्याला हटवण्यात आले होते. त्यामुळे बीसीसीआय पुन्हा त्याच्याकडे जाईल असे वाटत नाही. सध्या कर्णधारपदासाठी श्रेयस अय्यरचे (Shreyas Iyer) नाव सर्वात प्रबळ दावेदार म्हणून समोर येत आहे.
श्रेयसच्या नेतृत्वाखाली पंजाब किंग्स (PBKS) संघ या हंगामात जबरदस्त कामगिरी करत आहे. संघाने अद्याप एकही सामना गमावलेला नाही आणि ते जेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. श्रेयस केवळ फक्त चांगलं नेतृत्वच करत नाही, तर स्वतः तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर येऊन धडाकेबाज फलंदाजीही करत आहे. सूर्या सध्या 35 वर्षांचा आहे, तर श्रेयस 31 वर्षांचा आहे. वयाच्या दृष्टीनेही श्रेयस दीर्घकाळासाठी फिट बसतो. आता बीसीसीआयची निवड समिती सूर्यकुमार यादवबाबत काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Comments are closed.