यासिन मलिकला पाकिस्तानकडून निधी मिळतो
ईडीचा एकूण 7 जणांवर आरोप : हवालामार्गे 9 कोटी रुपये मिळाले
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
एनआयएच्या विशेष न्यायालयाने यासीन मलिक समवेत 7 आरोपींच्या विरोधात पीएमएलए अंतर्गत आरोप निश्चित करण्याचा आदेश दिला. आरोपींच्या विरोधात पुरेसे पुरावे असल्याचे न्यायलयाने म्हटले आहे. आरोपींनी पाकिस्तान आणि इतर दहशतवादी संघटनांकडून हवाला तसेच विविध माध्यमांद्वारे 8.94 कोटी रुपये मिळविले आणि ही रक्कम आरोपींपर्यंत पोहोचविण्यात आल्याचा आरोप ईडीने केला आहे. यासीन मलिक समवेत आरोपींमध्ये जहूर अहमद शाह वटाली, अब्दुल राशिद शेख, शबीर अहमद शाह, नवल किशोर कपूर, ट्रिसन फार्म्स अँड कंस्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड आणि मसरत आलम भट सामील आहे. ईडीने गुन्ह्याद्वारे अर्जित रकमेच्या तपासासाठी 14 जून 2017 रोजी गुन्हा नोंदविला होता.
पुढील सुनावणी 30 रोजी
यासीन मलिकला सौदी अरेबियामधून 15.75 लाख रुपये मिळाले होते असे न्यायालयाने एनआयएच्या आरोपपत्राचा उल्लेख करत म्हटले. तर याप्रकरणी पुढील सुनावणी 30 ऑक्टोबर रोजी होईल.
JKLF चे प्रमुख
यासीन मलिक जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटचा (जेकेएलएफ) प्रमुख होता. ही संघटना 1990 च्या दशकापासून जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया आणि हिंसेत सामील राहिली आहे. जहूर अहमद शाह वटालीच्या ठिकाणांवरून जप्त दस्तऐवजांमध्ये विदेशी फंडिंगची माहिती मिळाली होती. त्यानुसार 2015-16 या आर्थिक वर्षात वटालीद्वारे यासीन, शबीर अहमद शाह आणि मसरत आलम यांना विदेशातून रक्कम प्राप्त झाली होती. सरकारने 2019 मध्ये जेकेएलएफवर युएपीए अंतर्गत बंदी घातली.
दहशतवादात सामील
1980 च्या दशकात यासीन मलिक जेकेएलएफशी जोडला गेला. 1989-90 मध्ये खोऱ्यात दहशतवाद वाढण्यादरम्यान यासीन हा संघटनेच्या प्रमुख चेहऱ्यांपैकी एक होता. त्या काळात अनेक दहशतवादी हल्ल्यांच्या कटात तो सामील होता. 1994 मध्ये यासीनने हिंसेचा मार्ग सोडण्याची घोषणा केली. यानंतर त्याने स्वत:ला एक फुटिरवादी नेता म्हणून सादर केले. तो हुर्रियत कॉन्फरन्सशी जोडला गेला आणि दीर्घकाळापर्यंत काश्मीरमध्ये फुटिरवादी राजकारणाचा चेहरा राहिला.
Comments are closed.