योगी आदित्यनाथ यांच्या आईचे निधन
उत्तराखंडमध्ये 91 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
वृत्तसंस्था/ डेहराडून
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मातोश्री सावित्री देवी यांचे शुक्रवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या 91 वर्षांच्या होत्या. उत्तराखंडमधील पौरी गढवाल जिह्यातील पंचूर गावात शुक्रवारी सकाळी 10:45 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ शुक्रवारी एका सार्वजनिक कार्यक्रमात असतानाच त्यांना ही दु:खद बातमी समजल्यानंतर आपले नियोजित कार्यक्रम रद्द करत उत्तराखंडमध्ये जाणे पसंद केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगी आदित्यनाथ यांच्याशी संवाद साधून शोकभावना व्यक्त करत त्यांचे सांत्वन केले. पंतप्रधानांसोबतच संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी आणि इतर अनेक प्रमुख नेत्यांनीही तीव्र शोक व्यक्त केला.
सावित्री देवी उत्तराखंडमधील पौरी गढवाल जिह्यातील यमकेश्वर ब्लॉकच्या पंचूर गावात राहत होत्या. हे योगी आदित्यनाथ यांचेही वडिलोपार्जित गाव असून त्यांच्या कुटुंबीयांचे हे मूळ गाव आहे. योगी आदित्यनाथ यांचा जन्म उत्तराखंडमध्ये होऊन बालपणही तिथेच गेले. मे 2022 मध्ये योगी आदित्यनाथ यांनी बऱ्याच कालावधीनंतर त्यांच्या पंचूर या वडिलोपार्जित गावाला भेट दिली होती. यावेळी त्यांनी त्यांच्या आई सावित्री देवी यांची भेट घेतली होती.
Comments are closed.