तुमच्या सल्ल्याची गरज नाही.

द्रविड मुन्नेत्र कझगमचा राहुल गांधी यांना इशारा

वृत्तसंस्था, चेन्नई

तामिळनाडूमध्ये द्रविड मुन्नेत्र कळघम आणि काँग्रेस यांच्यातील मतभेद अधिक तीव्र होताना दिसत आहे. राहुल गांधी यांनी या राज्यात छात्रोंकी गूंज या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात त्यांनी तामिळ संस्कृतीविषयी काही विधाने केली आहेत. या विधानांमुळे द्रमुक पक्ष संतप्त झाला असून या पक्षाच्या प्रवक्त्याने राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली. राहुल गांधी यांच्या उपदेशाची आम्हाला आवश्यकता नाही. राहुल गांधी यांनी तामिळ भाषेच्या स्वतंत्र अस्तित्वासंबंधी एक शब्दही उच्चारला नाही. यातून त्यांचा अंतस्थ हेतू स्पष्ट होत आहे. त्यांनी आता तामिळ संस्कृतीसंबंधी बेगडी प्रेम दाखविण्याचा उद्योग थांबवावा, असे प्रतिपादन द्रमुकचे प्रवक्ते सर्वानन अण्णादुराई यांनी केले आहे.

भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस यांच्यात मोठा फरक नाही. हे दोन्ही पक्ष हिंदी भाषिक आणि उत्तर भारतीय मानसिकतेचेच आहेत. राहुल गांधी यांनी तामिळ संस्कृतीच्या संरक्षणाचा पुळका येण्याचे कारण नाही. गांधी यांच्या कार्यक्रमाचे नावच हिंदी आहे. या कार्यक्रमाला नाव देताना ते तामिळ भाषेतील असावे, एवढा साधा संकेतही राहुल गांधी यांनी पाळलेला नाही. आम्ही आमच्या संस्कृतीचे संवर्धन कसे करावे, हे त्यांनी आम्हाला शिकविण्याची आवश्यकता नाही. ते आम्हाला चांगले कळते, असा शब्दांमध्ये अण्णादुराई यांनी टीका केली आहे.

दरी आणखी रुंदावली

तामिळनाडूमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत टीव्हीके पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसने या निवडणुकीत द्रमुकशी युती केली होती. तथापि, द्रमुकला सत्ता मिळणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर काँग्रेसने अचानक टीव्हीके पक्षाला पाठिंबा देत द्रमुकशी बऱ्याच काळापासून असलेली युती तोडली. त्यामुळे द्रमुक पक्षाचा संताप झाला असून या पक्षाने विरोधी पक्षांच्या आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याने मतभेदांची दरी वाढली आहे.

Comments are closed.