वायुसेनेचे विमान कोसळून पाच जवानांना हौतात्म्य – TMarathiNews

आसाममध्ये अपघात : कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश

वृत्तसंस्था/ गुवाहाटी

आसाममधील जोरहाट येथे भारतीय वायुसेनेच्या वाहतूक विमानाला झालेल्या अपघातात पाच सुरक्षा जवानांना हौतात्म्य प्राप्त झाले आहे. भारतीय वायुसेनेने पाच जवानांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. हा अपघात शनिवारी जोरहाट हवाई तळावर झाला. अपघाताच्या फोटो आणि व्हिडिओमध्ये वाहतूक विमानाचे दोन तुकडे झाल्याचे दिसत आहे. हवाई दलाची आपत्कालीन प्रतिसाद पथके घटनास्थळी कार्यरत आहेत. हवाई दलाने अपघाताचे कारण निश्चित करण्यासाठी ‘कोर्ट ऑफ इन्क्वायरी’चे आदेश दिले आहेत.

वायुसेनेचे एएन-32 हे वाहतूक विमान जोरहाट हवाई तळावर कोसळले. विमान उतरताच त्याला आग लागली. हवाई दलाने आता अधिकृतपणे दुजोरा देत  या अपघातात पाच जवानांना वीरमरण आल्याचे जाहीर केले आहे. स्क्वाड्रन लीडर प्रशांत सिंग, फ्लाइट लेफ्टनंट शुभम कुमार, सार्जंट जितेंद्र शर्मा, अग्निवीर एअरमन खेमाराम कुमावत आणि अग्निवीर एअरमन दानिश आलम यांनी कर्तव्य बजावत असताना सर्वोच्च बलिदान दिले.

हवाई तळावर घबराट… बचावकार्य गतिमान

विमानाला आग लागताच लष्करी तळावर घबराट पसरली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन, हवाई दलाचे आपत्कालीन पथक आणि जलद कृती दल तात्काळ सक्रिय करण्यात आले. घटनास्थळी दाखल झालेल्या हवाई तळावरील अग्निशमन दलाच्या वाहनांनी आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले. त्याचवेळी, विमानातील कर्मचारी आणि इतर कर्मचाऱ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी तातडीने आपत्कालीन बचाव मोहीम सुरू करण्यात आली. मात्र, तरीही जीवितहानीला सामोरे जावे लागले.

चौकशी समितीचे आदेश

आसाममधील जोरहाट हवाई तळावर एएन-32 या वाहतूक विमानाचा अपघात होऊन पाच भारतीय हवाई दल जवानांनी आपले प्राण गमावले आहेत. सह-वैमानिक अपघातातून बचावला असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. अपघाताचे कारण निश्चित करण्यासाठी चौकशी समिती गठीत करून तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

वायुदलाकडून शोकसंदेश

भारतीय हवाई दलाने ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपघातासंबंधीची माहिती दिली आहे. आसाममधील जोरहाट येथे झालेल्या एएन-32 विमान अपघातात आपल्या पाच जवानांच्या झालेल्या हौतात्म्याबद्दल भारतीय हवाई दल तीव्र दु:ख व्यक्त करते, असे वायुदलाने म्हटले आहे. भारतीय हवाई दल शोकाकुल कुटुंबियांप्रति तीव्र शोकसंवेदना व्यक्त करते आणि या दु:खाच्या प्रसंगी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

अपघातग्रस्त AN-32 विमान…

एएन-32 हे भारतीय हवाई दलाचे मध्यम पल्ल्याचे, दोन इंजिन असलेले वाहतूक विमान आहे. हे विमान प्रामुख्याने तत्कालीन सोव्हिएत संघाच्या अँटोनोव्ह डिझाइन ब्युरोने विकसित केले होते. हे विमान दुर्गम भूभाग आणि जास्त उंचीवर उ•ाण करण्यासाठी ओळखले जाते. भारतीय हवाई दल गेल्या अनेक दशकांपासून सैन्य वाहतूक, शस्त्रs आणि रसद पुरवठा, आपत्ती निवारण कार्ये आणि मानवतावादी मदत मोहिमांसाठी एएन-32 चा वापर करत आहे. याचे सर्वात उल्लेखनीय वैशिष्ट्या म्हणजे तुलनेने लहान, कच्च्या धावपट्टीवरून उ•ाण आणि लँडिंग करण्याची क्षमता यामुळे ईशान्य आणि हिमालयीन प्रदेशात त्याची उपयुक्तता लक्षणीयरीत्या वाढते. हे विमान 40 पेक्षा जास्त सैनिक किंवा अनेक टन लष्करी उपकरणे वाहून नेऊ शकते. तथापि, त्याच्या दीर्घ सेवाकाळामुळे भारतीय हवाई दल हळूहळू आपल्या ताफ्याचे आधुनिकीकरण करत आहे.

Comments are closed.