डब्यातील गूळ चिकट होऊन वितळतोय?
चहा, लाडू, पोळ्या, खीर अशा अनेक पदार्थांमध्ये गुळाचा वापर केला जातो. मात्र, बदलते हवामान, वाढलेली उष्णता आणि हवेमधील ओलावा यामुळे गूळ मऊ पडतो, चिकट होतो किंवा त्याला पाणी सुटू लागते. अशा वेळी गूळ जास्त काळ चांगला टिकवण्यासाठी त्याची साठवण योग्य पद्धतीने करणे गरजेचे आहे. यासाठी काही सोप्या गोष्टी लक्षात घेऊयात.
हवाबंद डबा
गूळ साठवण्यासाठी स्वच्छ, पूर्णपणे कोरडी आणि हवाबंद काचेची किंवा योग्य दर्जाच्या स्टीलची बरणी वापरावी. डब्यात ओलावा राहणार नाही, याची काळजी घ्यावी.
थंड आणि कोरडी जागा
गुळाचा डबा गॅसजवळ, खिडकीजवळ किंवा थेट सूर्यप्रकाश पडणाऱ्या ठिकाणी ठेवू नये. उष्णतेमुळे गुळाचा पोत बदलू शकतो. त्याऐवजी स्वयंपाकघरातील थंड, कोरडी आणि सावलीची जागा निवडावी.
ओला हात न वापरणे
गूळ काढताना नेहमी स्वच्छ आणि कोरडा चमचा वापरावा. ओले हात किंवा चमचा डब्यात घातल्यास त्यात ओलावा जाण्याची शक्यता असते. रोजच्या वापरासाठी थोडा गूळ वेगळ्या छोट्या डब्यात काढून घ्यावा.
फ्रिजमध्ये ठेवणे
गूळ जास्त काळ साठवायचा असेल तर तो हवाबंद डब्यात ठेवून फ्रिजमध्ये साठवू शकता. डबा उघडताना त्यावर ओलावा जमा होणार नाही, याची काळजी घ्यावी.
नियमित तपासणी
गुळाला वास येत असेल किंवा बुरशी दिसत असेल, तर तो खाणे टाळावे.
हेही वाचा – कांदा चिरताना डोळ्यांतून पाणी येतं? या टिप्स करून पाहा
Comments are closed.