11 भारतीय टँकर होर्मुझ सामुद्रधुनी पार करतात
एलपीजी-कच्च्या तेलाचा पुरवठा वाढणार : विदेश मंत्रालयाची माहिती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अमेरिका-इराणदरम्यान करारानंतर होर्मुझ सामुद्रधुनीतील वाहतूक पूर्ववत होऊ लागली आहे. याचदरम्यान पर्शियन उपसागरात भारतीय ध्वज असलेली 10 जहाजे अद्याप आहेत, तर दोन अन्य भारतीय जहाजे भारताच्या दिशेकडून पर्शियन उपसागरात पोहोचली आहेत, अशी माहिती भारताच्या विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल यांनी दिली आहे. 17 जून रोजी अमेरिका-इराणदरम्यान करार झाल्यापासून आतापर्यंत भारताच्या दिशेने येणाऱ्या 11 जहाजांनी सुरक्षित स्वरुपात होर्मुझ सामुद्रधुनी ओलांडली आहे. यातील भारतीय ध्वज असलेले 3 टँकर्स सामील असून यातील प्रत्येक टँकरवर जवळपास 2.85 लाख मेट्रिक टन कच्चेतेल भरलेले आहे.
याचबरोबर एक विदेशी ध्वज असलेला एलपीजी कॅरियर, विदेशी ध्वज असणारा क्रूड ऑइल टँकर आणि खतांसह येत असलेली 6 विदेशी ध्वजयुक्त बल्क कॅरियरही भारताच्या दिशेने रवाना झाली आहेत. पर्शियन उपसागरात अद्याप अडकून पडलेली उर्वरित भारतीय जहाजेही लवकरच सुरक्षितपणे होर्मुझ सामुद्रधुनी पार करत पोहोचतील, अशी अपेक्षा आहे. सरकार सातत्याने संबंधित देश आणि यंत्रणांच्या संपर्कात असून भारतीय जहाजे आणि खलाशांची सुरक्षा सुनिश्चित केली जात असल्याचे जायसवाल यांनी सांगितले आहे.
भारतीय ध्वज असलेली 3 विशाल क्रूड ऑइल टँकर देशवैभव, देश विभोर आणि सनमार हेराल्डने यशस्वीपणे होर्मुझ पार केले आहे. यात एकूण 8 लाख 60 हजार मेट्रिक टनापेक्षा अधिक कच्चे तेल भरलेले असून या जहाजांवर 94 भारतीय खलाशी आहेत. देशवैभव गुजरातच्या वडिनार बंदरावर तर देशविभोर सिक्का येथे पोहोचणार आहे. सनमार हेराल्ड 1 जुलै रोजी ओडिशाच्या पारादीप बंदरावर दाखल होणार आहे.
खतांची आयात अन् कृषी सुरक्षा
भारताच्या अन्नसुरक्षेसाठी आवश्यक खतांची आयात देखील याच मार्गाने होत आहे. चार जहाजांनी यूरिया, डीएपी आणि सल्फरसह होर्मुझ सामुद्रधुनी ओलांडली आहे. ही जहाजं आंध्रप्रदेशच्या कृष्णापट्टणम, काकिनाडा आणि ओडिशाच्या पारादीप तसेच गुजरातच्या मुंद्रा बंदरावर पोहोचतील. खरीप हंगामापूर्वी खतांचा पुरवठा सुनिश्चित होणे शेतकऱ्यांसाठी अत्यंत आवश्यक आहे.
17 जूनला करार
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इराणचे राष्ट्रपती मसूद पेजेश्कियान यांनी 17 जून रोजी युद्ध समाप्त करण्यासाठी इलेक्ट्रॉनिकली सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली होती. या कराराच्या अखेरच्या अटींवर चर्चा करण्यासाठी युद्धविरामाला 60 दिवसांसाठी वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अमेरिका आणि इराणमधील या सामंजस्य कराराचे भारताने स्वागत केले होते.
Comments are closed.