भवानीपूरमधील मतदान यंत्रे सुरक्षित ठेवा.
बॅनर्जी यांच्या याचिकेवर उच्च न्यायालयाचा आदेश
वृत्तसंस्था/ कोलकाता
पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कलकत्ता उच्च न्यायालयात सादर केलेल्या निवडणूक याचिकेच्या संदर्भात उच्च न्यायालयाने एक महत्वपूर्ण आदेश दिला आहे. या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांचा स्वत:चाही पराभव झाला होता. ज्या भवानीपूर मतदारसंघात त्यांचा पराभव झाला होता, त्या मतदारसंघातील सर्व मतदान यंत्रे आणि व्हीव्हीपॅट यंत्रे सुरक्षित ठेवली जावीत. आवश्यकता भासल्यास त्यांची पडताळणी केली जाईल, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. 16 जूनला ममता बॅनर्जी यांनी ही याचिका सादर केली आहे.
मतदान यंत्रे, व्हीव्हीपॅट यंत्रे यांच्याप्रमाणेच या मतदारसंघाच्या निवडणुकसंदर्भातील सर्व कागदपत्रे, सीसीटीव्ही फूटेज आणि इतर संर्व संबंधित नोंदी सुरक्षित ठेवण्यात याव्यात, असा उच्च न्यायालयाचा आदेश आहे. भवानीपूर विधानसभा मतदारसंघ हा ममता बॅनर्जी यांचा बालेकिल्ला मानला जातो. तथापि, तेथून यावेळी ममता बॅनर्जी यांचा भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आणि विद्यमान मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी 15 हजारहून अधिक मतांनी पराभव केला आहे.
याचिकेत आरोप
भवानीपूर विधानसभा मतदारसंघातील निवडणूक निर्णयाला आव्हान देणारी ही याचिका आहे. मतगणना करताना मोठा घोटाळा झाला आहे. मतगणना प्रक्रियेचे योग्य कार्यान्वयन झालेले नाही. मतांच्या हिशेबात आणि मतांच्या विभागणीत हेतुपुरस्सर गडबड करण्यात आली आहे. आपल्याला हरविण्यासाठी मतगणना अधिकाऱ्यांनी अवैध पद्धतींचा अवलंब केला. मतगणनेच्या 12 व्या फेरीनंतर गणना केंद्रात आपल्याला मारहाण करण्यात आली. आपल्या प्रतिनिधीलाही मारहाण करण्यात येऊन दोघांनाही बाहेर काढण्यात आले, असे आरोप याचिकेत आहेत.
4 मे ला काय घडले…
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीची मतगणना 4 मे 2026 या दिवशी करण्यात आली. ममता बॅनर्जी दुपारनंतर त्यांच्या मतगणना केंद्रात पोहचल्या होत्या. मात्र, त्यावेळी त्या मतगणनेत मागे पडल्या होत्या. काही वेळाने त्या मतगणना केंद्राच्या बाहेर आल्या. आपल्याला आणि आपल्या प्रतिनिधीला मारहाण करुन आणि धक्के मारुन बाहेर काढण्यात आले, असा आरोप त्यांनी केला होता.
भाजपने फेटाळले आरोप
ममता बॅनर्जी यांचे सर्व आरोप भारतीय जनता पक्षाने फेटाळले आहेत. मतगणना केंद्रात ममता बॅनर्जी यांना पूर्ण सुरक्षा नियमाप्रमाणे देण्यात आली होती. कोणीही त्यांना मारहाण किंवा धक्काबुक्की केली नाही. आपण मतगणनेत मागे पडत आहोत आणि आपला पराभव निश्चित आहे, हे दिसून आल्यानेच त्यांनी मतगणना केंद्रातून स्वत:हून काढता पाय घेतला, असे या पक्षाने स्पष्ट केले आहे.
Comments are closed.