कुरियन यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला.

राज्यसभेवर पुन्हा नियुक्ती न झाल्याने त्यागपत्र

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

केंद्रीय राज्यमंत्री जॉर्ज कुरीयन यांनी मंत्रिपदाचा त्याग केला आहे. यांनी आपले त्यागपत्र राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे मंगळवारी पाठवले. त्यांचा राज्यसभा सदस्यत्वाचा काळ 21 जून 2026 या दिवशी संपला आहे. पण त्यांची पुन्हा राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आलेली नसल्याने त्यांनी मंत्रिपदाचा त्याग केला.

65 वर्षांचे जॉर्ज कुरीयन यांच्याकडे केंद्र सरकारमध्ये अल्पसंख्य कल्याण विभाग, मत्स्यपालन आणि पशुपालन या विभागांचे राज्यमंत्रीपद होते. ते ऑगस्ट 2024 मध्ये मध्यप्रदेशातून पोटनिवडणुकीत राज्यसभेवर निवडले गेले होते. त्यांचा कार्यकाळ दोन वर्षांचा होता. ते भारतीय जनता पक्षाचे केरळमधील ज्येष्ठ नेते मानले जातात. नुकत्याच झालेल्या केरळ विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नव्हती. त्यामुळे त्यांना पुन्हा राज्यसभा सदस्यत्व देण्यात आले नाही, असेही बोलले जाते. मात्र, भारतीय जनता पक्षाने हा आरोप फेटाळला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या केरळमध्ये होणाऱ्या जाहीर सभांमध्ये त्यांच्या भाषणांचे मल्याळम भाषेत भाषांतर करण्याचे उत्तरदायित्वही त्यांच्यावर होते. कुरीयन यांच्या प्रमाणेच रवनीत सिंग बिट्ठू या केंद्रीय मंत्र्यांनाही राज्यसभेची उमेदवारी पुन्हा देण्यात आली नव्हती.

मलबार चर्चशी संबंधित

जॉर्ज कुरीयन हे केरळमधील मलबार चर्चशी संबंधित मानले जातात. हे कॅथॉलिक पंथाचे चर्च आहे. कुरीयन यांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाने केरळमध्ये ख्रिश्चन समाजात आपली पाळेमुळे घट्ट करण्याचा प्रयत्न चालविला आहे. या समाजाची काही मते भारतीय जनता पक्षाला मिळवून देण्यात त्यांचे योगदान आहे. तथापि, 2026 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या प्रभावाचा विशेष उपयोग भारतीय जनता पक्षाला झाला नव्हता. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला एकंदर 140 पैकी केवळ 3 जागांवर समाधान मानावे लागले होते. नुकत्याच पार पडलेल्या राज्यसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी यांची कामगिरी स्पृहणीय झाली. एकंदर 27 जागांपैकी या पक्षाला 19 जागांवर विजय मिळाल्याने त्याचे बळ राज्यसभेत आणखी वाढले.

Comments are closed.