श्रींच्या ११६ व्या पुण्यतिथी उत्सवाला उत्साहात सुरुवात; भजनी दिंड्यांचे शेगावमध्ये आगमन
श्री संत गजानन महाराज संस्थान, शेगाव येथे श्रींच्या ११६ व्या पुण्यतिथी उत्सवाला शनिवार १२ सप्टेंबरपासून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. पाच दिवस चालणार्या या उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, राज्याच्या विविध भागांतून भजनी दिंड्या नामघोष करीत संत नगरीत दाखल होत आहेत.
उत्सव काळात दररोज सकाळी ६ ते ६.४५ वाजता काकडा, सकाळी ७.१५ ते ९ वाजता भजन, दुपारी ४ ते ५ वाजता प्रवचन, सायंकाळी ५.३० ते ६ वाजता हरिपाठ आणि रात्री ८ ते १० वाजता महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांचे हरिकीर्तन होणार आहे. १२ सप्टेंबर रोजी ह.भ.प. प्रशांत बुवा ताकोते (शिरसोली), १३ सप्टेंबर रोजी ह.भ.प. सुरेश बुवा बाकडे (पोफाळी), १४ सप्टेंबर रोजी ह.भ.प. भरत बुवा चौधरी (म्हैसवाडी) आणि १५ सप्टेंबर रोजी ह.भ.प. अच्युत बुवा दस्तापूरकर (परभणी) यांचे कीर्तन होणार आहे. तसेच मंगळवार, दि. १५ सप्टेंबर रोजी सकाळी ७ ते ९ वाजता श्रींच्या समाधी सोहळ्यानिमित्त ह.भ.प. भरत बुवा चौधरी यांचे विशेष कीर्तन होणार आहे.
गणेशयाग व वरुणयागाला प्रारंभ – उत्सवानिमित्त शनिवारपासून श्री गणेशयाग व वरुणयागाला सुरुवात झाली. मंगळवार १५ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता यागाची पूर्णाहुती व अवभृत स्नान होणार आहे. त्यानंतर दुपारी श्रींची पालखी अश्व, पताकाधारी व टाळकरींसह परिक्रमेकरिता निघणार आहे. बुधवार, दि. १६ सप्टेंबर रोजी सकाळी ६ ते ७ वाजता ह.भ.प. निवृत्ती बुवा तराळे (व्याळा) यांचे काल्याचे कीर्तन होणार असून, त्यानंतर दहीहंडी व गोपालकाल्याने उत्सवाची सांगता होईल.
भजनी दिंड्यांनी शेगाव नगरी गजबजली – पुण्यतिथी उत्सवासाठी राज्यातील विविध भागांतून ‘ज्ञानोबा-तुकाराम’, ‘गजानन अवलिया अवतारले’ अशा जयघोषात भजनी दिंड्या शेगावमध्ये दाखल होत आहेत. मंदिर परिसरात आकर्षक रंगीबेरंगी विद्युत रोषणाई करण्यात आली असून, आंब्याच्या पानांची तोरणे व केळीचे खांब लावण्यात आल्याने संपूर्ण परिसरात मंगलमय वातावरण निर्माण झाले आहे. दोन दिवस श्रींचे मंदिर रात्रभर दर्शनासाठी खुले – पुण्यतिथी उत्सवानिमित्त दि. १४ व १५ सप्टेंबर रोजी भाविकांची मोठी गर्दी अपेक्षित असल्याने श्रींचे मंदिर सोमवार व मंगळवार असे दोन दिवस रात्रभर दर्शनासाठी खुले राहणार आहे. भाविकांना दिवसा तसेच रात्रीही श्रींच्या समाधीचे दर्शन घेता येणार आहे. संस्थानच्या वतीने श्री समाधी दर्शनबारी, श्रीमुख दर्शनबारी, महाप्रसाद तसेच भक्त निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी संस्थानचे सेवेकरी सेवा देण्यासाठी तत्पर असून, संपूर्ण मंदिर परिसरात स्वच्छता व आवश्यक सोयी-सुविधांची व्यवस्था करण्यात आली आहे.
मंदिर परिसरात मोबाईल वापरास सक्त मनाई – श्री मंदिरात प्रवेश करताना मुख्य प्रवेशद्वारावरच मोबाईल बंद करावा. मंदिर परिसरातील पावित्र्य, सुरक्षा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच भाविकांना सुलभ व सुरक्षित दर्शन घेता यावे आणि गर्दीचे प्रभावी व्यवस्थापन करता यावे, यासाठी मंदिर परिसरात मोबाईलचा वापर करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
Comments are closed.