पुणे पुन्हा हादरले! भरधाव कारने आयटी इंजिनिअरला चिरडले, कारचालक १९ वर्षांचा तरुण

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

पुण्यातील पाषाण-बावधन रस्त्यावरील नेकलेस गार्डन परिसरात एक अत्यंत भीषण आणि दुर्दैवी अपघात घडला आहे. नेहमीप्रमाणे सकाळी जॉगिंग करणाऱ्या विरेंद्र द्विवेदी (वय ४२) या सॉफ्टवेअर इंजिनिअरचा भरधाव कारच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की द्विवेदी यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे पुणे शहरात खळबळ उडाली असून नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार, विरेंद्र द्विवेदी हे पाषाण-बावधन मार्गावरील नेकलेस गार्डनजवळ सकाळी जॉगिंग करत होते. त्याच वेळी एका भरधाव कारवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि कारने द्विवेदी यांना थेट जोरदार धडक दिली. प्राथमिक माहितीनुसार, ही कार एक १९ वर्षांचा तरुण चालवत होता. या भीषण अपघातात कारचालकही जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यू

अपघातानंतर विरेंद्र द्विवेदी गंभीर जखमी झाले होते. घटनेनंतर ज्या कारने धडक दिली, त्याच कारमधून त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात अपघातग्रस्त कारबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. संबंधित कार ही ब्लूरेज डेव्हलपर्स या कंपनीच्या नावावर नोंदणीकृत असून, गाडीचा अधिकृत पत्ता अबिल हाऊस येथील असल्याचे समोर आले आहे.

पोलिसांकडून गुन्हा दाखल, CCTV तपास सुरू

या प्रकरणी पोलिसांनी अपघाताची नोंद केली असून अधिक तपास सुरू केला आहे. हा अपघात नेमका कसा घडला आणि त्यावेळी वाहनाचा वेग किती होता, हे जाणून घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्हीफुटेजची तपासणी केली जात आहे.

Comments are closed.