उज्जैनमध्ये मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत V13 जखमी.

मध्यप्रदेशातील महाकाल नागचंद्रेश्वरमधील घटना

वृत्तसंस्था/ उज्जैन

मध्यप्रदेश राज्यातील उज्जैन येथील महाकाल नागचंद्रेश्वर मंदिरात चेंगराचेंगरीसदृश घटना घडली आहे. या घटनेत 13 भाविक जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. श्रावणमासाच्या प्रथम सोमवारी या मंदिरात दरवर्षीप्रमाणे मोठ्या संख्येने भाविक आलेले असताना ही घटना घडली, अशी माहिती देण्यात आली. एका अफवेमुळे ही घटना घडल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

भाविकांना रांगेत दर्शन घेता यावे, यासाठी मंदिरात बॅरिकेड्स लावण्यात आले होते. मात्र, या बॅरिकेड्समध्ये विद्युत प्रवाह असून त्यामुळे शॉक लागत आहे, अशी अफवा काही जणांकडून पसरविण्यात आली. त्यामुळे भाविकांची पळापळ झाली. या पळापळीत काही भाविक चेंगरले गेले, असे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. अफवा कोणी पसरविली, याची चौकशी करण्याचा आदेश प्रशासनाकडून दिला गेला आहे.

काही भाविक बेशुद्ध

अफवा उठताच अनेक भाविकांनी बॅरिकेड्सपासून दूर जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काही बॅरिकेडस्वर अतिरिक्त दाब पडून त्या मोडून पडल्या. यामुळे त्यांना रेलून उभे असलेले भाविक खाली पडले. त्यांच्या अंगावरून अन्य भाविक पळाल्याने अनेक जण जखमी झाले. काही भाविक भीतीने किंवा चेंगराचेंगरीमुळे बेशुद्ध झाले. मात्र, कालांतराने उपचारानंतर ते शुद्धीवर आल्याचे दिसून आले. या दुर्घटनेत जावितहानी झाली नाही, हे सुदैव आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.

जिल्हाधिकारी घटनास्थळी

चेंगराचेंगरीचे वृत्त कळताच उज्जैनच्या जिल्हाधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी स्वत: आपत्ती निवारण कार्यावर लक्ष ठेवले. आपत्ती निवारण दले त्वरित घटनास्थळी पाठविण्यात आली होती. मंदिराच्या परिसरात असणाऱ्या ‘बडा गणेश  मंदिरा’मध्येही काही प्रमाणात गोंधळ निर्माण झाला होता. तथापि, तो वेळीच नियंत्रणात आणण्यात आल्याने परिस्थिती सुरळीत झाली. चेंगराचेंगरीची घटनाही त्वरित नियंत्रणात आणण्यात आल्याने नंतर भक्तांना सुरळीतपणे दर्शन मिळाले. भाविकांनी अफवांवर विश्वास ठेवून भीतीग्रस्त होऊ नये, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले. तसेच मंदिर परिसरात सुरक्षा वाढविण्यात आली.

 

Comments are closed.