NEET पेपर लीक प्रकरणी 14 जणांवर गुन्हा दाखल

दिल्लीच्या विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल : आता 25 नोव्हेंबरपासून दररोज सुनावणी होणार

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

दिल्लीतील विशेष जलदगती न्यायालयाने नीट-यूजी 2026 पेपरफुटी प्रकरणातील सर्व 14 आरोपींवर शनिवारी औपचारिकपणे आरोप निश्चित केले. यामध्ये नॅशनल टेस्टिंग एजन्सीशी (एनटीए) संबंधित तीन विषयतज्ञांचा समावेश आहे. न्यायालयाने आरोपींवर कट रचणे, फसवणूक, गुन्हेगारी स्वरूपाचा विश्वासघात आणि भ्रष्टाचार यासह अनेक आरोप ठेवले आहेत. आता या प्रकरणाची दैनंदिन सुनावणी 25 नोव्हेंबरपासून सुरू होईल.

नीट-यूजी 2026 परीक्षा 3 मे रोजी झाली होती. यामध्ये अंदाजे 22 लाख उमेदवार परीक्षेला बसले होते. पेपरफुटीचे आरोप समोर आल्यानंतर एनटीएने 12 मे रोजी परीक्षा रद्द केली. त्यानंतर 21 जून रोजी फेरपरीक्षा आयोजित करण्यात आली होती. याप्रकरणी 13 जणांना अटक झाली असून शनिवारी सर्व आरोपींना राऊस अॅव्हेन्यू न्यायालयातील विशेष न्यायाधीश अजय गुप्ता यांच्यासमोर हजर करण्यात आले. त्यांनी निर्दोष असल्याची कबुली देत खटल्याला सामोरे जाण्यास सहमती दर्शवल्याने आता खटल्याच्या सुनावणीची प्रक्रिया सुरू होणार आहे. सीबीआयने न्यायालयात आपली बाजू मांडण्यासाठी 360 साक्षीदारांचे जबाब, 422 कागदपत्रे आणि 43 भौतिक पुरावे गोळा केले आहेत. या पुराव्यांच्या आधारे प्रश्नपत्रिका फुटीचा कट आणि त्यामध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींची भूमिका सिद्ध करण्याचा तपास यंत्रणेचा प्रयत्न आहे.

दिल्लीतील विशेष न्यायालयाने 18 नोव्हेंबर रोजी 206 पानांच्या आदेशात सर्व 14 आरोपींविरुद्ध आरोप निश्चित करण्याचे निर्देश दिले. गुन्हेगारी कट, फसवणूक, विश्वासघात आणि भ्रष्टाचार यासह विविध गुह्यांसाठी आरोपींविरुद्ध प्रथमदर्शनी पुरेसे पुरावे आहेत. न्यायालयाच्या मते आरोपींनी बेकायदेशीरपणे एनटीए परीक्षेचे गोपनीय साहित्य मिळवून ते परीक्षार्थींना पुरविले. न्यायालयाने या संपूर्ण प्रकाराला एका संघटित कटाचा भाग असे संबोधले आहे.

गोपनीयता पाळली नसल्याचा ठपका

या प्रकरणात सीबीआयने दोन स्वतंत्र आरोपपत्रे दाखल केली आहेत. 28 जुलै रोजी दाखल केलेल्या पहिल्या आरोपपत्रात 13 जणांची नावे होती. यामध्ये राष्ट्रीय परीक्षा संस्थेशी संबंधित तीन विषयतज्ञ, कोचिंग संस्थांशी संबंधित दोन व्यक्ती आणि प्रश्नपत्रिका फुटीच्या कथित कटात सहभागी असलेल्या मध्यस्थांचा समावेश आहे. या विषयतज्ञांमध्ये जीवशास्त्र विषयाच्या मनीषा गुरुनाथ मांढरे, रसायनशास्त्र विषयाचे प्रल्हाद विठ्ठलराव कुलकर्णी आणि भौतिकशास्त्र विषयाच्या मनीषा संजय हवालदार यांचा समावेश आहे. ह्या तीन व्यक्ती ‘एनटीए’साठी काम करत असल्यामुळे ते लोकसेवक मानले जातात. या तिघांनी इतर आरोपींसोबत मिळून परीक्षेचे गोपनीय प्रश्न बेकायदेशीरपणे मिळवल्याने त्यांनी गोपनीयता पाळली नसल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. प्रश्नपत्रिकांची गोपनीयता राखण्याची जबाबदारी त्या तिघांची असल्याचा दावा तपास यंत्रणांनी केला आहे.

चहाविक्रेता शेषराव सूर्यवंशी याचाही आरोपीमध्ये समावेश

14 ऑक्टोबर रोजी तपास यंत्रणांनी पुरवणी आरोपपत्र दाखल केले. यामध्ये महाराष्ट्रातील नांदेडचा रहिवासी असलेल्या चहाविक्रेता शेषराव बजरंग सूर्यवंशी ऊर्फ राज सूर्यवंशी याला आरोपी करण्यात आले. त्यामुळे या प्रकरणातील एकूण आरोपींची संख्या 14 झाली आहे. महाराष्ट्रातील एका चहाविक्रेत्याचे नाव या प्रकरणात आल्याने या तपासाला राज्याच्या दृष्टीनेही महत्त्व प्राप्त झाले आहे. त्याला 2 सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली होती.

पेपरफुटीमुळे पात्र उमेदवारांचे नुकसान

पेपरफुटीप्रकरणी अटक करण्यात आलेल्या तिन्ही तज्ञांना गोपनीय माहिती उघड केल्याने उमेदवारांचे नुकसान होऊ शकते याची पूर्ण जाणीव होती, असे न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाच्या मते, पेपरफुटीमुळे उमेदवारांनी कोचिंग, प्रवास आणि निवासावर खर्च केलेले पैसे वाया गेल्यामुळे आर्थिक नुकसान झाले असते. जर एखादे कृत्य कायद्यानुसार वेगवेगळे गुन्हे ठरत असेल, तर एकाच कृत्याच्या आधारे आरोपीवर अनेक गुह्यांसाठी खटला चालवला जाऊ शकतो, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

तिन्ही तज्ञच मुख्य सूत्रधार?

न्यायालयाच्या मते, मांढरे, कुलकर्णी आणि हवालदार यांच्याकडून गोपनीय साहित्य इतर आरोपींना देण्यात आले. यामध्ये धनंजय लोखंडे, शुभम खैरनार, यश यादव, मांगीलाल बिवाल, दिनेश बिवाल, विकास बिवाल आणि शेषराव बजरंग सूर्यवंशी यांचा समावेश होता. अर्थातच, पेपरफुटीची ही प्रक्रिया तीन तज्ञांपासून सुरू होऊन नंतर इतर आरोपींपर्यंत, एका आरोपीकडून दुसऱ्या आरोपीकडे क्रमाने हस्तांतरित केले गेल्याचे निदर्शनास येत असल्याचा दावा आरोपपत्रात करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणात अद्याप कोणत्याही सरकारी अधिकाऱ्याला किंवा राष्ट्रीय परीक्षा संस्थेच्या पदाधिकाऱ्याला आरोपी करण्यात आलेले नाही. विषयतज्ञ आणि खासगी व्यक्तींच्या नेटवर्कच्या माध्यमातून प्रश्नपत्रिका फुटीचा कट रचण्यात आल्याचा दावा तपास यंत्रणांनी केला आहे. आता न्यायालयीन सुनावणीदरम्यान या आरोपांची सत्यता आणि आरोपींची भूमिका स्पष्ट होणार आहे.

Comments are closed.