'ऑनलाइन फसवणूक' उघड

चार राज्यांमधील छाप्यात 22 जणांना अटक : दिल्ली पोलिसांची कारवाई

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

व्हॉट्सअॅपवरून एपीके फाईल्स पाठवून लोकांचे मोबाईल फोन हॅक करणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या एका मोठ्या नेटवर्कचा दिल्ली पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी चार राज्यांमधील आठ जिह्यांतील 17 ठिकाणी छापे टाकून 22 आरोपींना अटक केली. या ठकसेनांकडून अंदाजे 22,000 मोबाईल फोनमध्ये एपीके फाईल्स इन्स्टॉल करण्यात आल्याचे तपासात असे उघड झाले आहे. राष्ट्रीय सायबर गुन्हे नोंदणी पोर्टलवर (एनसीआरपी) दाखल झालेल्या 2,080 तक्रारींचा संबंधही या नेटवर्कशी जोडला गेला होता. पोलिसांनी आरोपींकडून 68 मोबाईल फोन जप्त केले. या टोळीचा मुख्य तळ झारखंडमधील जामतारा येथे होता.

दिल्ली पोलिसांच्या पश्चिम जिल्हा सायबर टीमला सायबर फसवणुकीच्या असंख्य तक्रारी मिळत होत्या. या प्रकरणांचा तपास करत असताना एक हजाराहून अधिक तक्रारींमधील फसवणुकीच्या पद्धती सारख्याच असल्याचे अधिकाऱ्यांना दिसून आले. लोकांना व्हॉट्सअॅपद्वारे एपीके फाईल्स पाठवून त्यांची फसवणूक केली जात असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी या तक्रारी एकत्रित करून गुन्हेगारांना ओळखण्यासाठी तपास सुरू केला. या कारवाईदरम्यान पोलिसांनी विविध बँक खात्यांमध्ये जमा असलेले अंदाजे 20 कोटी रुपये गोठवले. अटक केलेल्या आरोपींची सध्या चौकशी सुरू आहे. या नेटवर्कमुळे किती लोकांचे आर्थिक नुकसान झाले आणि या टोळीत आणखी कोण सामील होते, हे पोलीस शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

62 पोलिसांच्या पथकाकडून एकाचवेळी छापासत्र

तपासादरम्यान आरोपींची ठिकाणे ओळखण्यात आली. त्यानंतर दिल्ली पोलिसांचे 62 सदस्यांचे एक पथक झारखंडमध्ये दाखल झाले. पोलिसांनी झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमधील 17 ठिकाणी एकाचवेळी छापे टाकले. या कारवाईत 22 सायबर फसवणूक करणाऱ्यांना अटक करण्यात आली. या टोळीचे मुख्य केंद्र झारखंडमधील जामतारा हे होते. तसेच उत्तर प्रदेशातील देवघर, गिरीडीह, नवादा, जमुई आणि गोरखपूर यांसह इतर भागांमध्येही छापे टाकण्यात आले. छाप्यादरम्यान, काही आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करताना दिसले. तर एका ठिकाणी आरोपींनी पोलीस पथकाशी प्रतिकार करण्याचाही प्रयत्न केला.

एपीके फाईल्स वापरून फसवणूक

एपीके फाईल ही अँड्रॉइड फोनवर अॅप्स इन्स्टॉल करण्यासाठी वापरली जाणारी एक फाईल आहे. सायबर गुन्हेगार लोकांच्या फोनमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी या फाईलचा वापर करत होते. ते व्हॉट्सअॅपवर लोकांना एपीके फाईल्स पाठवत असत. फाईल डाउनलोड करून इन्स्टॉल केल्यानंतर, ते अॅप गॅलरी, कॉल्स आणि मेसेजेस यांसारख्या फीचर्स वापरण्याची परवानगी मागत असे. जर वापरकर्त्याने या परवानग्या दिल्या, तर ते अॅप फोनमधील वैयक्तिक माहिती मिळवू शकत असे. लोकांना लक्ष्य करण्यासाठी फसवणूक करणारे हीच पद्धत वापरतात.

टोळी तीन स्तरांवर कार्यरत

फसवणूक करणाऱ्या टोळीचे संपूर्ण नेटवर्क तीन स्तरांवर कार्यरत होते, असे पोलिसांच्या तपासात असे उघड झाले. पहिल्या स्तरावर एपीके फाईल्स तयार करणारे डेव्हलपर्स होते. दुसऱ्या स्तरावर लोकांना या फाईल्स वितरित करणारे सदस्य होते. तिसऱ्या स्तरावर या माहितीचा वापर करून सायबर फसवणूक करणारे होते. त्यानंतर, पोलिसांनी या प्रकरणात एपीके फाईल्स तयार करणाऱ्या तीन डेव्हलपर्सना अटक केली. छाप्यादरम्यान 68 मोबाईल फोन जप्त करण्यात आले. पोलिसांच्या मते, लोकांना एपीके फाईल्स पाठवण्यासाठी या मोबाईल फोनचा वापर केला जात होता.

या नेटवर्कशी संबंधित 2,080 तक्रारी

या टोळीच्या एपीके फाईल्स अंदाजे 22,000 मोबाईल फोनवर इन्स्टॉल करण्यात आल्या होत्या. राष्ट्रीय सायबर गुन्हे नोंदणी पोर्टलवर दाखल झालेल्या 2,080 तक्रारी थेट या प्रकरणाशी संबंधित होत्या. या कारवाईमुळे या तक्रारींशी संबंधित प्रकरणे सोडवण्यात मदत झाली.

Comments are closed.