केरळ ते दिल्लीपर्यंत दमदार पर्जन्यवृष्टी गुजरातमध्ये पूरातून 19 जणांची सुटका; जम्मू काश्मीरमध्ये भूस्खलनामुळे रस्ता बंद
► वृत्तसंस्था नवी दिल्ली
मान्सून देशातील जवळपास सर्व राज्यांमध्ये पोहोचला आहे. राजस्थान आणि गुजरातचे काही भाग अजून बाकी असला तरी त्याआधीच पावसामुळे गुजरातमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. गुजरातच्या मेंदेरडा भागातील समाधियाला गावाजवळ पुराच्या पाण्यात चार वाहने अडकली होती, त्यातून 19 जणांना वाचवण्यात आले. दरम्यान, केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश, जम्मू काश्मीर, उत्तराखंड या राज्यांसह राजधानी दिल्लीतही दमदार पर्जन्यवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
देशाच्या पूर्व आणि दक्षिणेकडील राज्यांमध्ये यापूर्वीच दमदार पर्जन्यधारा कोसळत असून काही भागात पूरस्थितीही निर्माण झाली आहे. राजस्थानच्या जयपूरमध्ये मुसळधार पावसानंतर सवाई मानसिंग रुग्णालयाच्या मायनर ओटीमध्ये पाणी शिरले आणि तेथून रुग्णांना हलवण्यात आले. शुक्रवारी भोपाळ आणि इंदूरसह मध्य प्रदेशातील 26 हून अधिक जिह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला. उज्जैनमध्ये एक तरुण आपल्या मोटरसायकलसह पूल ओलांडण्याचा प्रयत्न करत असताना वाहून गेला.
उत्तर प्रदेशातील 20 जिह्यांमध्ये पाऊस झाला. कानपूरमधील जीएसव्हीएम वैद्यकीय महाविद्यालयात पाणी शिरले असून, गाड्या आणि दुचाकी अंशत: पाण्याखाली गेल्या होत्या. दरम्यान, जम्मू काश्मीरमध्ये शनिवारी सकाळी भूस्खलनामुळे रामनगर-उधमपूर रस्ता बंद करण्यात आला.
भारतीय हवामान विभागाने गुजरात आणि सौराष्ट्र-कच्छमध्ये मान्सून सक्रिय झाल्यानंतर दमदार पाऊस बरसणार असल्याचा इशारा दिला आहे. गेल्या 24 तासांत सौराष्ट्र-कच्छ प्रदेशातील जिह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. रविवारी सकाळी 8:30 वाजल्यापासून सुरत, तापी, दांग, नवसारी, वलसाड, दमण, दादरा आणि नगर हवेली; तसेच सौराष्ट्रातील भावनगर, अमरेली, गिर सोमनाथ आणि दीव या जिह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस आणि तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
काश्मीर, उत्तरप्रदेशमध्येही दमदार
जम्मू काश्मीरमध्ये सततच्या पावसामुळे रामनगर-उधमपूर रस्त्यावर कौहाजवळ दरड कोसळली. भूस्खलन झाल्यामुळे रस्त्यावर मोठे दगड आणि ढिगारा कोसळून रस्ता बंद झाला. उत्तर प्रदेशात मान्सूनचा पाऊस सुरू आहे. हवामान विभागाने येथील 28 जिह्यांसाठी पावसाचा इशारा दिला आहे. मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याचीही शक्यता आहे. कानपूरमध्ये पावसाने 15 वर्षांचा विक्रम मोडला. येथे 3 जुलै रोजी 108 मिमी पावसाची नोंद झाली. यापूर्वी 1 जुलै 2011 रोजी 101 मिमी पाऊस झाला होता.
दिल्लीत यलो अलर्ट जारी
दिल्लीच्या अनेक भागांत शनिवारी मोठा पाऊस बरसला. दिवसभर आकाश ढगाळ होते आणि सकाळच्या सुमारास आर्द्रता 77 टक्के होती. भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवत ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. पुढील काही तासांत शहराच्या काही भागांमध्ये मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ताशी 30-40 किलोमीटर वेगाच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
पूर्व, दक्षिण भारतात धो धो पाऊस
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. भारतीय हवामान विभागाने पश्चिम बंगालच्या दक्षिण 24 परगणा आणि पूर्व मेदिनीपूर जिह्यांसाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. झाडग्राम, पश्चिम मेदिनीपूर आणि हावडासाठी ‘ऑरेंज अलर्ट’ देखील जारी केला आहे. रविवारी परिस्थिती आणखी बिघडू शकते असा इशाराही देण्यात आला आहे. शनिवारी केरळच्या अनेक भागांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळल्याने अनेक नद्या आणि धरणांची पाणीपातळी वाढला.
सखल भागांमध्ये पूर आला आणि मालमत्तेचे नुकसान झाले. पालक्काड जिह्यात मुसळधार पावसामुळे दोन घरांच्या सीमाभिंती कोसळल्या, तर कोझिकोडच्या उत्तरेकडील उंच डोंगराळ भागात मुसळधार पाऊस झाला. हवामान विभागाने शनिवारी ओडिशाच्या पाच जिह्यांमध्ये मुसळधार पावसासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. कंधमाल, बौध, अंगुल, संबलपूर आणि सोनपूर जिह्यांसाठी हा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मुसळधार पावसामुळे आलेल्या अचानक आलेल्या पुरामुळे आणि भूस्खलनामुळे अरुणाचल प्रदेशातील अनेक दुर्गम गावांचा राज्याच्या उर्वरित भागाशी संपर्क तुटला होता. या समस्येमुळे प्रशासनाला पूरग्रस्त भागात अन्न आणि औषधे पोहोचवण्यासाठी व्यावसायिक हेलिकॉप्टर तैनात करावे लागले. अनेक ठिकाणी पूल कोसळल्याने आणि भूस्खलनामुळे रस्ते बंद झाले असून पूरस्थितीत मोठ्या प्रमाणावर व्यत्यय निर्माण झाला आहे.
Comments are closed.