24 पैकी 20 डॉट बॉल्स! आरसीबीच्या खेळाडूची कहर गोलंदाजी, आयपीएलच्या इतिहासात प्रथमच घडले असे

आयपीएल २०२६ च्या हंगामात सोमवारी (२७ एप्रिल) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स समोरा-समोर आले. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात आरसीबीने एकतर्फी विजय मिळवला. आरसीबीच्या गोलंदाजांनी कहर कामगिरी करत डीसीला अवघ्या ७५ धावसंख्येवरच रोखले. यामध्ये एका २२ वर्षीय फिरकी गोलंदाजाची कामगिरी आयपीएलच्या इतिहासात नोंदवली गेली आहे.

नाणेफेक जिंकत आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदारने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भुवनेश्वर कुमार आणि जोश हेझलवूड यांच्या वेगवान गोलंदाजीनंतर सुयश शर्माच्या फिरकीसमोर डीसीचे खेळाडू संघर्ष करताना दिसले. त्याने आपल्या ४ षटकांच्या स्पेलमध्ये ३ वाईडसह केवळ ७ धावा दिल्या. यामध्ये त्याने एक षटक निर्धाव टाकले आणि एक विकेटही घेतली. तसेच त्याचा इकॉनॉमी रेट १.७५ होता, जी आयपीएलमधील एक दुर्मिळ कामगिरी ठरली.

सुयशचा इकॉनॉमी रेट आयपीएलच्या इतिहासात संयुक्तपणे दुसरा सर्वात किफायतशीर स्पेल ठरला. या यादीत पहिल्या स्थानी युझवेंद्र चहल आहे. त्याने १.५ च्या इकॉनॉमी रेटने ४ षटके टाकली होती. याबरोबरच त्याने एक ऐतिहासिक विक्रम आपल्या नावावर केला आहे.

या सामन्यात सुयशने टाकलेले २० निर्धाव चेंडू हे एका फिरकीपटूने आयपीएलमध्ये टाकलेले सर्वाधिक निर्धाव चेंडू ठरले आहेत. आयपीएलच्या इतिहासात एकाच सामन्यात सर्वाधिक निर्धाव चेंडूचा विक्रम वेगवान गोलंदाज दीपक चाहरच्या नावावर होता, ज्याने २०१९ मध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध २० चेंडू निर्धाव टाकले होते. आता सुयश आणि दीपक या दोघांच्याही नावावर हा विक्रम संयुक्तपणे नोंदवला गेला आहे.

सुयशने २०२३च्या हंगामात आयपीएल पदार्पण केले. केकेआरकडून खेळताना त्याने पहिल्याच सामन्यात आऱसीबीविरुद्ध ३० धावा देत ३ विकेट्स घेतल्या होत्या. २०२३ आणि २०२४ हंगाम केकेआरकडून खेळल्यानंतर तो २०२५ हंगामापासून आरसीबीशी जोडला गेला आहे. आतापर्यंत त्याने ३४ आयपीएल सामन्यांमध्ये २४ विकेट्स घेतल्या असून त्याचा इकॉनॉमी रेट ८.५५ आहे.

Comments are closed.