मनू भाकरला वैभव सूर्यवंशीबाबत ‘तो’ प्रश्न विचारला अन् सोशल मीडियावर संतापाचा स्फोट झाला, ऑलिम्पिक विजेती नेमबाज काय म्हणाली?

हिंदुस्थानचा 15 वर्षीय खेळाडू वैभव सूर्यवंशी याचे तुफान सध्या आयपीएलमध्ये घोंघावत आहे. राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्या या युवा खेळाडूने भल्याभल्या गोलंदाजांना सीमारेषा दाखवली आहे. जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट, पॅट कमिन्स यासारख्या आंतरराष्ट्रीय गोलंदाजांना पहिल्याच चेंडूवर त्याने षटकार ठोकण्याचा कारनामा केला आहे. त्यामुळे क्रीडा वर्तुळात त्याच्याच नावाची चर्चा आहे. त्याच्याबाबत हिंदुस्थानची स्टार नेमबाज आणि ऑलिम्पिक पदक विजेती मनू भाकर हिला प्रश्न विचारण्यात आला. यामुळे सोशल मीडियावर संतापाचा स्फोट झाला आहे.

नुकत्याच दिल्लीत पार पडलेल्या ‘नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडिया’च्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मनू भाकर हिला 15 वर्षीय क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशी याच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. एका ऑलिम्पिक विजेत्या खेळाडूला क्रिकेटमधील उदयोन्मुख खेळाडूवर मत विचारल्याने क्रीडा प्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. ऑलिम्पिक पदक विजेत्या खेळाडूला क्रिकेटपटूबाबत प्रश्न विचारल्याने नेटकऱ्यांनी माध्यम प्रतिनिधींनाही चांगलेच फैलावर घेतले आहे.

वैभव सूर्यवंशीबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना 24 वर्षीय मनू भाकर म्हणाली की, जर योग्य मार्गदर्शन आणि चांगली सोबत असेल, तर वय हा केवळ एक आकडा आहे. प्रतिभेला वयाचे बंधन नसते. चांगली कामगिरी वयाच्या सहाव्या वर्षीही होऊ शकते आणि साठाव्या वर्षीही होऊ शकते. जर वैभवला योग्य मार्गदर्शन मिळाले, तर तो नक्कीच भविष्यातील मोठा स्टार बनेल.

दरम्यान, मनू भाकरच्या उत्तराचे कौतुक होत असले तरी तिला हा प्रश्न विचारण्यावरून सोशल मीडियावर टीकेची राळ उठली आहे. कोलकाता नाईट रायडर्सचे माजी संघ संचालक जॉय भट्टाचार्य यांनी एक्सवर पोस्ट करत आपली नाराजी व्यक्त केली आहे. मनू एक ऑलिम्पिक विजेती खेळाडू असून तिला वैभव सूर्यवंशीबाबत विचारणे हे तिच्या कर्तृत्वाचा आणि तिच्या खेळाचा अपमान करण्यासारखे आहे. आपल्या देशात आधीच क्रिकेटचे वेड आहे. संपादकांनी हेडलाईन मिळवण्यासाठी सेलिब्रिटींच्या कोटाचा वापर करणे थांबवले पाहिजे. पुढच्या वेळी वैभवला मनू भाकरबद्दल विचारून पहा, तेव्हा कळेल, असे ते म्हणाले.

नेटकऱ्यांनीही यावर आपले मत व्यक्त केले आहे. क्रिकेटपटूंना कधीही इतर खेळांतील खेळाडूंच्या कामगिरीबद्दल विचारले जात नाही. मग ऑलिम्पिक पदक विजेत्यांनाच क्रिकेटवर प्रश्न का विचारले जातात? असा सवाल नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

Comments are closed.