23 वर्षीय खेळाडूचा वर्ल्ड रेकॉर्ड, टी20 क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा ठरला जगातील पहिलाच फलंदाज

सध्या सर्वांच्या नजरा आयपीएल २०२६ वर खिळल्या आहेत. आयपीएलचा यंदाचा हंगाम आता अखेरच्या टप्प्यात पोहोचला आहे, ३ प्लेऑफचे संघ निश्चित झालेले असताना आता अखेरच्या स्थानासाठी ४ संघांमध्ये लढत सुरू आहे. यादरम्यान टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक नवा विश्वविक्रम घडला आहे. २३ वर्षीय फलंदाज कॉनर कॅरोल याने हा विक्रम रचला.

क्रोएशिया संघाचा सलामीवीर कॉनर कॅरोल याने पुन्हा एकदा तुफानी फलंदाजी करत टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विश्वविक्रम आपल्या नावावर केला आहे. अवघ्या २३ वर्षाच्या डावखुऱ्या फलंदाजाने आपल्या कारकिर्दीतील पहिल्या तीन टी-२० आंतरराष्ट्रीय डावांमध्ये तब्बल २९५ धावा करत नवा इतिहास घडवला. याआधी हा विक्रम फ्रान्सच्या गुस्ताव मॅककिऑनच्या नावावर होता. त्याने पहिल्या तीन डावांत २८६ धावा केल्या होत्या. मात्र, कॅरोलने तिसऱ्या सामन्यात ७४ धावांची खेळी करत हा विक्रम मोडीत काढला.

टी-२० विश्वचषक युरोप पात्रता स्पर्धेत फ्रान्सविरुद्धच्या सामन्यात कॅरोलने क्रोएशियासाठी पदार्पण केलं. २०९ धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना संपूर्ण संघ अपयशी ठरला, पण कॅरोलने एकहाती झुंज दिली. त्याने अवघ्या ३४ चेंडूत ७१ धावांची स्फोटक खेळी केली. विशेष म्हणजे, या सामन्यात त्याच्यानंतर संघातील खेळाडूची सर्वाेच्च धावसंख्या १२ धावा होती. त्यामुळे कॅरोलची ही खेळी संघासाठी महत्त्वाची ठरली.

त्यानंतर स्वित्झर्लंडविरुद्धच्या सामन्यातही कॉनर कॅरोलने आपला वादळी फॉर्म कायम ठेवला. त्याने अवघ्या ७२ चेंडूत तब्बल १५० धावांची धडाकेबाज खेळी केली. या खेळीत त्याने १० षटकार आणि १३ चौकार लगावले. क्रोएशियाच्या उर्वरित चार फलंदाजांनी मिळून फक्त ४१ धावा केल्या, यासह संघाची धावसंख्या २ बाद ११९ धावा अशी होती.

फलंदाजीतील या मास्टरक्लासनंतर कॅरोलने गोलंदाजीतही चमक दाखवत आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिली विकेट घेतली. अखेरीस स्वित्झर्लंडचा संघ लक्ष्यापासून १६ धावा दूर राहिला. तिसऱ्या आंतरराष्ट्रीय सामन्यात जर्सीसारख्या मजबूत संघाविरुद्ध क्रोएशियाच्या गोलंदाजांची मोठी कसोटी लागली. जर्सीने ३ बाद २८० धावांचा प्रचंड डोंगर उभारला. कॅरोललाही गोलंदाजीत संघर्ष करावा लागला आणि त्याने चार षटकांत ६३ धावा दिल्या.

मात्र, धावांचा पाठलाग करताना त्याने पुन्हा एकदा जबरदस्त खेळी साकारली. त्याने अवघ्या ३१ चेंडूत ७४ धावा करत सलग तिसऱ्या सामन्यात संघाचा सर्वोच्च धावसंख्या करणारा फलंदाज ठरला. या खेळीत त्याने ९ षटकार आणि ३ चौकार लगावले. मात्र, इतर फलंदाजांकडून साथ न मिळाल्याने क्रोएशियाचा डाव अखेरीस १७१ धावांवर आटोपला. या अफलातून तीन सामन्यांनंतर कॅरोलची आंतरराष्ट्रीय आकडेवारीही थक्क करणारी आहे. त्याच्या नावावर १४७.५० च्या सरासरीने आणि २१५.३२ च्या जबरदस्त स्ट्राइक रेटने २९५ धावा आहेत.

आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करण्यामागे देशांतर्गत क्रिकेटची भक्कम पार्श्वभूमी आहे. गेली दोन वर्षे तो ऑस्ट्रेलियातील ग्रेड क्रिकेटमध्ये सातत्याने खेळत आहे. इतकंच नाही, तर फेब्रुवारी २०२६ मध्ये त्याने दक्षिण ऑस्ट्रेलिया सेकंड इलेव्हनकडूनही सामना खेळला होता.

Comments are closed.