हिंदुस्थानचा 3D खेळाडू देशांतर्गत क्रिकेट आणि IPL मधून निवृत्त, सोशल मीडियावर पोस्ट करत दिली माहिती; कारण काय?
हिंदुस्थानचा 3D क्रिकेटर म्हणून नावारुपाला आलेल्या विजय शंकरने आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्याने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट शेअर करत भावनिक मेसेज शेअर केला आहे. परदेशातील लीगमध्ये खेळण्याच्या संधी मिळवण्यासाठी आणि आपल्या क्रिकेट कारकिर्दीचा काळ वाढवण्यासाठी त्याने हा मोठा निर्णय घेतला आहे. नुकत्याच झालेल्या आयपीएल लिलावात त्याला कोणत्याही संघाने खरेदी केले नव्हते, त्यानंतर त्याने हा मार्ग निवडल्याची चाहत्यांमध्ये चर्चा आहे.
विजय शंकरने आपल्या निवृत्तीच्या निवेदनात BCCI आणि आपल्या चारही आयपीएल संघांचे (GT, SRH, CSK आणि DC) आभार मानले आहेत. त्याने 2019 च्या विश्वचषकातील पदार्पणाच्या चेंडूवर घेतलेली पहिली विकेट आणि हिंदुस्थानच्या 500 व्या एकदिवसीय सामन्यातील शेवटचे षटक या आठवणींना उजाळा दिला. “देशाचे प्रतिनिधित्व करणे हा माझ्यासाठी सर्वोच्च सन्मान होता,” असे भावनिक उद्गार त्याने यावेळी काढले. तसेच, कारकिर्दीत आलेल्या टीका आणि नकारात्मकतेकडे दुर्लक्ष करून आपण नेहमी सकारात्मक राहिल्याचेही त्याने नमूद केले.
— Vijay Shankar (@vijayshankar260) 22 मे 2026
विजय शंकरची कारकीर्द आकडेवारीनुसार संमिश्र राहिली आहे. त्याने आयपीएलमध्ये 10 हंगामात 78 सामने खेळताना 1233 धावा केल्या आणि 9 बळी घेतले. देशांतर्गत क्रिकेटमध्ये तामिळनाडूचे प्रतिनिधित्व करताना 77 प्रथम श्रेणी सामन्यात 4253 धावा आणि 43 विकेट्स त्याच्या नावावर आहेत. हिंदुस्थानसाठी 12 एकदिवसीय आणि 9 टी-20 सामने खेळलेल्या शंकरने आता आपला मोर्चा परदेशी मैदानांवर वळवण्याचा निर्धार केला आहे.
Comments are closed.