कोलंबो कसोटीतून 33 वर्षीय सारांश जैनचे भारतीय संघात पदार्पण, श्रीलंकेचा सामना करणाऱ्या मध्य प्रदेशच्या अष्टपैलूचा विजय-शमीच्या खास यादीत एंट्री

श्रीलंका आणि भारत यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. यातील पहिला सामना जिंकत भारताने आघाडी घेतली असून दुसरा सामना आजपासून (रविवार, 23 ऑगस्ट) कोलंबो येथे खेळला जात आहे. या सामन्यातून 33 वर्षीय सारांश जैनचे आंतरराष्ट्रीय पदार्पण झाले आहे.
सारांश भारतासाठी कसोटी पदार्पण करणारा 320 वा खेळाडू ठरला आहे. त्याला अनुभवी अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा याने कसोटी कॅप प्रदान केली. 33 वर्षे 145 दिवस वय असलेला सारांश हा 21व्या शतकातील भारताचा सर्वात वयस्कर कसोटी पदार्पण करणारा खेळाडू आहे. यापूर्वी, 2000 मध्ये ढाका येथे बांगलादेशविरुद्ध कसोटी पदार्पण करताना सबा करीम यांचे वय 32 वर्षे 362 दिवस होते.
तसेच सारांश, जानेवारी 2021 मधील वॉशिंग्टन सुंदरनंतर भारतासाठी पदार्पण करणारा तो पहिला ऑफ-स्पिनर ठरला आहे. त्याचबरोबर त्याचा मुरली विजय आणि मोहम्मद शमी यांच्या खास यादीत समावेश झाला आहे. तो आयपीएलमध्ये पदार्पण करण्यापूर्वी आंतरराष्ट्रीय पदार्पण करणारा तिसरा भारतीय खेळाडू ठरला आहे.
IPL पदार्पणापूर्वी आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण करणारे भारतीय खेळाडू
मुरली विजय (कसोटी – विरुद्ध ऑस्ट्रेलिया, नागपूर, 2008)
मोहम्मद शमी (एकदिवसीय – विरुद्ध पाकिस्तान, दिल्ली, 2013)
सारांश जैन (कसोटी – विरुद्ध श्रीलंका, कोलंबो एसएससी, 2026)
कोलंबो कसोटीमध्ये भारताचा कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
सारांश जैनची कामगिरी
मध्य प्रदेशमध्ये जन्मलेला सारांश डावखुरा फलंदाज आणि उजव्या हाताचा ऑफ स्पिनर आहे. त्याला सर्वाधिक अनुभव रेड बॉल क्रिकेटचा आहे.
सारांशने 54 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 31.75 च्या सरासरीने 2223 धावा केल्या असून 188 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने 67 लिस्ट ए आणि 20 टी 20 सामनेही खेळले आहेत, मात्र कसोटी क्रिकेटमधील सातत्यपूर्ण कामगिरीमुळे त्याला श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघात निवडले गेले.
सारांशने 2014 मध्ये रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण केले. 2022 मध्ये तो देशांतर्गंत क्रिकेटमध्ये एक महत्त्वाचा खेळाडू म्हणून उद्यास आला.
तसेच नुकताच झालेला रणजी ट्रॉफीचा हंगाम सारांशचा आतापर्यंतचा सर्वोत्तम हंगाम होता. त्याने 57.55 च्या सरासरीने 518 धावा केल्या आणि 30 विकेट्सही घेतल्या होत्या.
मध्य विभागाचे (सेंट्रल झोन) प्रतिनिधित्व करताना सारांश 2025-26 च्या दुलीप ट्रॉफीमध्ये ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ ठरला होता. या स्पर्धेत त्याने दोन अर्धशतके आणि 16 विकेट्स घेण्याची कामगिरी केली होती. (33-year-old Saransh Jain makes his debut for India in Colombo Test; who exactly is this all-rounder from Madhya Pradesh facing Sri Lanka?)
Comments are closed.