कोलंबोवर तिरंगा फडकवण्याची तयारी; हिंदुस्थान-श्रीलंका दुसरी कसोटी आजपासून
गॉलमध्ये श्रीलंकेचा 165 धावांनी धुव्वा उडवून कसोटी क्रिकेट मालिकेत 1-0 आघाडी घेतल्यानंतर टीम इंडिया आता कोलंबोमध्ये मालिकेवर निर्विवाद कब्जा करण्यासाठी सज्ज झाली आहे. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरी आणि निर्णायक कसोटी उद्यापासून (दि. 23) सिंहलीज स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर सुरू होत आहे. तीन वर्षांनंतर परदेशी भूमीवर कसोटी मालिका जिंकण्याचे स्वप्न साकारण्यासाठी हिंदुस्थानला आता फक्त एका विजयाची गरज आहे.
टीम इंडियाने परदेशातील अखेरची कसोटी मालिका जुलै 2023 मध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध जिंकली होती. त्यामुळे कोलंबो कसोटीत विजय मिळवून 2-0 अशी मालिका खिशात घालण्याचा हिंदुस्थानी संघाचा निर्धार आहे. श्रीलंकेसाठी मात्र घरच्या मैदानावरची परिस्थिती चिंताजनक आहे. हिंदुस्थान, इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलियाविरुद्ध श्रीलंकेने गेल्या दहा वर्षांत एकही मालिका जिंकलेली नाही. या संघांविरुद्ध घरच्या मैदानावरची ही सलग सहावी मालिका आहे, ज्यात श्रीलंकेला मालिका विजय मिळवता आलेला नाही. हिंदुस्थानविरुद्ध तर श्रीलंकेने 2008 नंतर एकदाही मालिका जिंकलेली नाही.
कुलदीपचा सारांश? तिसऱ्या फिरकीवर खल सुरू
हिंदुस्थानी संघासमोर सर्वांत मोठा प्रश्न तिसऱया फिरकीपटूचा आहे. गॉल कसोटीत कुलदीप यादवने दोन्ही डावांत मिळून केवळ 25 षटके टाकली आणि त्याच्या खात्यावर फक्त एक बळी जमा झाला. तो संघातील सर्वांत महागडा गोलंदाज ठरला. त्यामुळे कुलदीपच्या जागी ऑफस्पिनर सारांश जैनला पदार्पणाची संधी मिळण्याची शक्यता आहे. त्याने शुक्रवारी नेट्समध्ये प्रदीर्घ स्पेल टाकत शुभमन गिल आणि ऋषभ पंत यांना गोलंदाजी केली. श्रीलंकेच्या संघात डावखुऱ्या फलंदाजांची संख्या अधिक असल्याने सारांशला संधी मिळू शकते. मात्र कुलदीपला वगळण्याचा निर्णय अद्याप पक्का झालेला नाही. फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक साईराज बहुतुले यांनी त्याची पाठराखण केली आहे. एका सामन्याच्या कामगिरीवरून खेळाडूचे मूल्यमापन करू नये, असे त्यांनी स्पष्ट केले. अंतिम निर्णय खेळपट्टी आणि संघाच्या संयोजनावर अवलंबून असेल.
सुरुवातीला फलंदाजांची चलती, नंतर फिरकीचा फास
सिंहलीज स्पोर्ट्स क्लबची खेळपट्टी सुरुवातीला फलंदाजांना साथ देण्याची शक्यता आहे. चेंडू बॅटवर चांगला येत असल्याने पहिल्या डावात मोठी धावसंख्या उभारता येऊ शकते. मात्र, सामना जसजसा पुढे सरकेल तसतशी खेळपट्टी कोरडी होत जाऊन फिरकीपटूंना टर्न आणि उसळी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम फलंदाजी करण्यास प्राधान्य देण्याची शक्यता आहे.
Comments are closed.