स्टार्कचा षटकार; शोरिफुलचा पलटवार! दोन डावखुऱ्या गोलंदाजांनी टिपले 6-6 बळी, ऑस्ट्रेलिया-बांगलादेश कसोटीत पहिल्याच दिवशी रंगत
ऑस्ट्रेलिया बांगलादेश दरम्यानच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात गोलंदाजांनी तब्बल १८ फलंदाज बाद करीत पहिला दिवस गाजविला. ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कने बांगलादेशचे १२ धावांत ६ बळी टिपले. बांगलादेशचा पहिल्या डावात अवघ्या ६४ धावांत खुर्दा उडाला. मात्र, शोरिफुल इस्लामने ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांवर पलटवार करत ३५ धावांत ६ गडी बाद केले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाची देखील प्रत्युत्तरात ८ बाद १६५ अशी अवस्था झाली. मात्र, तरीही यजमान संघाकडे १०१ धावांची आघाडी असून, पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा, कॅमेरॉन ग्रीन ५१, तर नाथन लॉयन १० धावांवर खेळत होते.
नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि स्टार्कने पहिल्याच चेंडूवर शादमान इस्लामला शून्यावर बाद केले. त्यानंतर स्टार्कने अवघ्या २२ चेंडूंमध्ये पाच बळींचा टप्पा गाठला. बांगलादेशची ५ बाद १२ अशी दैना उडाली. संघाच्या आघाडीच्या सहा फलंदाजांपैकी शादमानसह तंझिद हसन, कर्णधार नजमुल हुसेन शांतो व लिटन दास या चौघांना तर भोपळाही फोडता आला नाही. स्टार्कच्या भेदक माऱ्यामुळे बांगलादेशचा डाव ६४ धावांवर गारद झाला. हा त्यांच्या कसोटी इतिहासातील चौथा सर्वांत कमी धावसंख्येचा डाव ठरला. संघाचा अकराव्या क्रमांकावरील शोरिफुल हा सर्वाधिक १४ धावा करणारा फलंदाज ठरला. पॅट कमिन्सने तीन बळी घेत स्टार्कला
उत्तम साथ दिली.
शोरिफुलचे प्रत्युत्तर!
ऑस्ट्रेलियाची सुरुवातही डळमळीत झाली. मॅट रेनशॉ (८), ट्रॅव्हिस हेड (२२) आणि मार्नस लाबुशेन (४) स्वस्तात परतल्यानंतर स्टीव्ह स्मिथ (४२) आणि कॅमेरॉ न ग्रीन (खेळत आहे ५१) यांनी चौथ्या विकेटसाठी ७७ धावांची भागीदारी रचत डाव सावरला. मात्र, त्यानंतर शोरिफुलच्या भेदक गोलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाची ७.३ षटकांत ५ बाद ३० अशी दुर्दशा झाली. स्मिथने ४२ धावांची झुंजार खेळी केली. मात्र, शोरिफुलच्या अप्रतिम चेंडूवर तो पायचित झाला. यानंतर शोरिफुलने अॅलेक्स कॅरी (५), ब्यू वेबस्टर (०) आणि पॅट कमिन्स (०) यांनाही फार काळ मैदानावर टिकू दिले नाही. अखेरीस स्टार्कलाही (१) शोरिफुलनेच बाद केले.
कॅमरॉन ग्रीनचे अर्धशतक
दिवसअखेर मात्र कॅमेरॉ न ग्रीन ऑस्ट्रेलियाच्या आशा जिवंत ठेवत ५१ धावांवर नाबाद आहे. त्याने ८१ चेंडूंत आठ चौकारांसह अर्धशतक झळकावले. त्याने संयमी आणि आक्रमक फलंदाजीचा सुरेख मेळ साधला.
Comments are closed.