पुजाराने निवडली बेस्ट टेस्ट इलेव्हन! 5 भारतीयांना संधी; पण ‘या’ दिग्गजांना ठेवलं बाहेर

सध्या सहा संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025-27 चे विजेतेपद मिळवण्यासाठी स्पर्धा करत आहेत. भारत श्रीलंकेविरुद्ध, तर इंग्लंड पाकिस्तानविरुद्ध खेळत आहे. त्याच वेळी, ऑस्ट्रेलियाचा सामना बांगलादेशशी होत आहे. या तिन्ही मालिका सध्या अत्यंत रंजक टप्प्यावर आहेत. बड्या संघांमधील या लढतींच्या पार्श्वभूमीवर, भारताचा दिग्गज माजी फलंदाज चेतेश्वर पुजाराने सध्याच्या खेळाडूंमधून आपली सर्वोत्कृष्ट कसोटी प्लेइंग इलेव्हन (Best Test XI) निवडली आहे. त्याने या संघात पाच भारतीय खेळाडूंचा समावेश केला आहे, परंतु पाकिस्तान, श्रीलंका किंवा बांगलादेशातील एकाही खेळाडूची निवड केलेली नाही.

चेतेश्वर पुजाराने सध्याच्या क्रिकेटपटूंमधून आपली सर्वोत्तम कसोटी प्लेइंग इलेव्हन निवडली आहे. या संघात पाच भारतीय, चार ऑस्ट्रेलियन आणि इंग्लंड व दक्षिण आफ्रिकेतील प्रत्येकी एका खेळाडूचा समावेश आहे.

पुजाराने एडन मार्करम आणि केएल राहुल यांची सलामीवीर म्हणून निवड केली. मधल्या फळीसाठी पुजाराने जो रूट आणि स्टीव्ह स्मिथ यांची निवड केली. जे सध्याच्या काळातील सर्वोत्तम फलंदाज मानले जातात. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत हे दोन्ही खेळाडू पहिल्या दोन स्थानांवर आहेत

त्यानंतर पुजाराने भारतीय कर्णधार शुमबन गिल आणि यष्टिरक्षक-फलंदाज रिषभ पंत यांचा संघात समावेश केला, तसेच अष्टपैलू खेळाडू म्हणून रवींद्र जडेजा आणि पॅट कमिन्स यांची निवड केली. मात्र, त्याने या निवडीसोबत एक अटही घातली आहे.

व्हिडिओमध्ये पुजारा म्हणाला, “हा संघ सामान्य खेळपट्टीसाठी (standard pitch) आहे. मात्र, जर सामना इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलियासारख्या ठिकाणी खेळला जाणार असेल, तर मी रवींद्र जडेजाच्या जागी वेगवान गोलंदाज किंवा वेगवान गोलंदाजी करणारा अष्टपैलू खेळाडू घेईन.”

त्याने असेही नमूद केले की, जर बेन स्टोक्स निवृत्त झाला नसता, तर त्याने त्याची संघात निवड केली असती.

शेवटी, ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड, भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि फिरकीपटू नॅथन लियॉन यांची निवड करून पुजाराने आपली सर्वोत्तम कसोटी प्लेइंग इलेव्हन पूर्ण केली. मात्र, त्याने या संघासाठी कर्णधाराचे नाव जाहीर केले नाही.

चेतेश्वर पुजाराची सर्वोत्तम ‘वर्ल्ड टेस्ट प्लेइंग इलेव्हन’

एडन मार्करम, केएल राहुल, जो रूट, स्टीव्ह स्मिथ, शुभमन गिल, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, नॅथन लायन, जसप्रीत बुमराह, पॅट कमिन्स आणि जोश हेझलवूड.

Comments are closed.