टी-20 क्रिकेटमध्ये धुमाकूळ! 20 षटकात 417 धावा, 47 षटकार…; एका फलंदाजाने 55 चेंडूंमध्ये ठोकल्य
20 षटकात 417 धावा इंग्लंड क्लब क्रिकेट : टी-20 क्रिकेटमध्ये सध्या धावांचा पाऊस पडणे सामान्य झाले आहे, परंतु इंग्लंडमधील एका स्थानिक सामन्यात फलंदाजांनी असा धुमाकूळ घातला की थेट क्रिकेट जगताचे डोळे दिपले. एका टी-20 सामन्यात संपूर्ण संघाने तब्बल 417 धावांचा डोंगर उभा केला, तर एका फलंदाजाने अवघ्या 55 चेंडूत द्विशतक झळकावण्याचा अद्भूत पराक्रम केला. इंग्लंडमधील एका क्लब क्रिकेट सामन्यात ही ऐतिहासिक आणि थरारक कामगिरी पाहायला मिळाली आहे. या संपूर्ण डावात तब्बल 47 षटकार आणि 22 चौकारांची आतिषबाजी करण्यात आली.
डम्बलटन क्रिकेट क्लबचा ऐतिहासिक पराक्रम
7 जुलै रोजी इंग्लंडमध्ये खेळवल्या गेलेल्या प्रीमियर वन टॉप टियर डिव्हिजनच्या एका सामन्यात डम्बलटन क्रिकेट क्लब आणि हेरदली रेडिंग्स हे संघ आमनेसामने होते. डम्बलटन क्लबने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मैदानात जे घडले ते क्रिकेटच्या इतिहासात यापूर्वी कधीही घडले नव्हते. 20 षटकांच्या खेळात डम्बलटनच्या फलंदाजांनी विरोधी गोलंदाजांना धु-धु-धूतले अवघ्या 2 बाद 417 धावा केल्या.
इवान गेगचे वादळी द्विशतक
डम्बलटन संघाचा सलामीवीर इवान गेग या सामन्याचा खरा नायक ठरला. त्याने मैदानाच्या चारी बाजूंना चौकार-षटकारांचा पाऊस पाडत अवघ्या 55 चेंडूंमध्ये 206 धावांची स्फोटक खेळी खेळली. टी-20 क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणे ही अत्यंत दुर्मिळ गोष्ट आहे. इवानने आपल्या या वादळी खेळीत 13 चौकार आणि 23 गगनचुंबी षटकार ठोकले. त्याला दुसऱ्या टोकाकडून डेन हॉलंडने चोख साथ दिली. हॉलंडने अवघ्या 37 चेंडूंत 122 धावांची धडाकेबाज खेळी केली.
418 धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना हेरदली रेडिंग्स संघाची अवस्था बिकट झाली. मात्र, त्यांच्या ब्लूमफील्ड नावाच्या फलंदाजाने एकतर्फी संघर्ष सुरू ठेवला. ब्लूमफील्डने 48 चेंडूंत 6 चौकार आणि 12 षटकांरांच्या मदतीने 109 धावांची शतकी खेळी केली. परंतु, इतर फलंदाजांच्या अपयशामुळे त्यांचा संपूर्ण संघ 229 धावांवर गारद झाला. डम्बलटन क्रिकेट क्लबने हा सामना 188 धावांच्या मोठ्या फरकाने जिंकून इतिहास रचला.
आंतरराष्ट्रीय आणि आयपीएलचे रेकॉर्ड्स
सध्या आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटचा विचार केला, तर सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम झिम्बाब्वेच्या नावावर आहे. झिम्बाब्वेने ऑक्टोबर 2024 मध्ये गांबियाविरुद्ध 20 षटकांत 344/4 धावा केल्या होत्या. तर भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये बडोदा संघाने डिसेंबर 2024 मध्ये सिक्कीमविरुद्ध 349/5 धावा केल्या होत्या. जगातील सर्वात मोठी लीग असलेल्या आयपीएल (IPL) मध्ये अजूनही 300 धावांचा टप्पा पार झालेला नाही, तिथला सर्वोच्च स्कोअर 287 धावांचा आहे. हा क्लब सामना असला, तरी 120 चेंडूंत 417 धावांचा आकडा पार करणे ही क्रिकेट विश्वातील एक अद्भूत घटना मानली जात आहे. आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 400 धावांचा हा टप्पा कधी पार होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हे ही वाचा –
Comments are closed.