142 वर्षांचा दुष्काळ संपला! भारत-इंग्लंड महिला कसोटी सामना लॉर्ड्सवर; कधी आणि कुठे पाहता येणार?
क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर भारत आणि इंग्लंड महिला संघांमधील कसोटी सामना खेळवला जाणार आहे. लॉर्ड्सच्या मैदानावर पहिल्यांदाच महिला कसोटी सामना खेळवला जात आहे. लॉर्ड्सवर पुरुषांचा पहिली कसोटी सामना 1885 मध्ये खेळवला गेला, परंतु त्याच मैदानावर खेळण्यासाठी महिलांना तब्बल 142 वर्षे वाट पाहावी लागली. हा ऐतिहासिक कसोटी सामना कधी, कुठे खेळवला जाणार आहे, जाणून घेऊया.
सुमारे तीन वर्षांपूर्वी इंग्लिश क्रिकेटबाबत करण्यात आलेल्या एका स्वतंत्र आढाव्यात, ‘लॉर्ड्स’वर महिलांची कसोटी क्रिकेट सामना अद्यापही आयोजित न केल्याबद्दल तीव्र टीका करण्यात आली होती. त्यानंतरच हे ऐतिहासिक पाऊल उचलण्यात आलं. या ऐतिहासिक सामन्याचा आनंद घेण्यासाठी चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. आतापर्यंत 30000 तिकिटांची विक्री झाली आहे. इंग्लंडच्या इतिहासात महिलांच्या कसोटी सामन्यासाठी विकल्या गेलेल्या तिकिटांची ही सर्वाधिक संख्या आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामन्याचा विचार करता, यजमान संघाविरुद्ध हरमनप्रीत कौरच्या संघाचं पारडं जड आहे. भारताने इंग्लंडमध्ये आतापर्यंत नऊ कसोटी सामने खेळले असून, त्या सर्व सामन्यांत संघ अपराजित राहिला आहे. नॅट सायव्हर-ब्रंटच्या नेतृत्वाखालील इंग्लंडचा संघ कसोटी क्रिकेटमधील सातत्यपूर्ण खराब कामगिरीमुळे संघर्ष करत आहे; गेल्या दहा वर्षांत त्यांना केवळ एकच कसोटी सामना जिंकता आला आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामना 8 जुलैपासून खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना दुपारी 3.30 वाजता सुरू होईल. इंग्लंडविरुद्धच्या एकूण कामगिरीचा विचार करता, भारताने 15 कसोटी सामन्यांपैकी तीन सामने जिंकले आहेत आणि एक सामना गमावला आहे, तर 11 सामने अनिर्णित राहिले आहेत.
Comments are closed.