तीन अधिकाऱ्यांसह ५२ अंमलदारांच्या तडकाफडकी बदल्या, लाचखोरीच्या प्रकरणानंतर आयुक्तांचा बडगा

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मुंब्रा वाहतूक शाखेतील एका ट्रॅफिक वॉर्डनला लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडल्यानंतर मुंब्रा युनिटमध्ये मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. या लाचखोर प्रकरणानंतर पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांसह ५२ अंमलदारांच्या तडकाफडकी बदल्या केल्या आहेत. दरम्यान गेल्या काही महिन्यांत वाढलेल्या लाचखोरीने ठाणे पोलीस दलाची अब्रू पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.

मुंब्रा वाहतूक युनिटमधील ट्रॅफिक वॉर्डन बुधवारी लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात अडकल्याने वाहतूक शाखेतील कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक शाखेतील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले आहेत. या प्रशासकीय फेरबदलांमध्ये पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक या तीन पदांवरील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. संबंधित अधिकाऱ्यांना पोलीस नियंत्रण कक्षात नियुक्त करण्यात आले आहे. त्याचबरोबर ५२ अंमलदार आणि हवालदारांना विद्यमान ठिकाणाहून उचलून दुसऱ्या ठिकाणी पाठवण्यात आले आहे. ठाणे पोलीस आयुक्तांनी बदल्यांचे आदेश काढले आहेत.

२७ वॉर्डनचीही उचलबांगडी

मुंब्रा वाहतूक युनिटमधील २७ वॉर्डनचीही उचलबांगडी करण्यात आली आहे. दरम्यान एकाच वेळी अधिकारी, अंमलदार आणि वाहतूक वॉर्डन अशा विविध स्तरांवर करण्यात आलेल्या या बदल्यांमुळे ठाणे पोलीस दलात मोठी उलथापालथ झाली आहे. पोलीस आयुक्तांनी केलेल्या या तडकाफडकी बदल्यामुळे ठाणे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

Comments are closed.