राज्यपालांच्या दुष्काळ पाहणीत सरकारच्या अब्रूचा पंचनामा; शेतकऱ्यांचे अनुदान कोणी अडवले?

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

दुष्काळाची पाहणी करण्यासाठी आलेले राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्यासमक्ष बलसूरच्या शेतकऱ्याने राज्य सरकारच्या अब्रूचा पंचनामा केला. स्वतःची पदरमोड करून ऊसासाठी सिंचनाची सोय केली; परंतु सरकारकडून अजून एक खडकूही अनुदान मिळाले नाही. शेतकऱ्यांचे अनुदान अडवणारा झारीतील शुक्राचार्य कोण? या शेतकऱ्याच्या प्रश्नावर खुद्द राज्यपालही निरुत्तर झाले!

राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी आज धाराशिव जिल्ह्याच्या उमरगा तालुक्यातील बलसूर तसेच काळ निंबाळा गावास भेटी देऊन दुष्काळाची पाहणी केली. दुष्काळाची पाहणी केल्यानंतर राज्यपालांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी शेतकऱ्यांनी अडचणींचा पाढाच राज्यपालांसमोर वाचला.

बलसूर येथील गोविंद येळमे यांनी स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून ऊसासाठी सिंचन व्यवस्था उभी केली. या योजनेसाठी राज्य सरकारकडून अनुदान देण्यात येते. मात्र त्यांना अद्याप एक पैसाही मिळालेला नाही. अनुदान मिळावे यासाठी त्यांनी खाल्लेल्या खस्तांची आपबीती राज्यपालांसमोर कथन केली. शेतकऱ्यांचे अनुदान अडवणारे झारीतील शुक्राचार्य कोण आहेत, असा सवाल त्यांनी केला. मात्र राज्यपाल या प्रश्नाचे उत्तर देऊ शकले नाहीत. शेतकऱ्यांनी केलेल्या प्रश्नांच्या सरबत्तीमुळे राज्यपालांच्या दौऱ्यात असलेल्या अधिकाऱ्यांची मात्र चांगलीच कोंडी झाली.

दुष्काळाच्या संकटाचा एकीने सामना करावा

दुष्काळाचा सामना करण्यासाठी प्रशासनाने काय उपाय केले आहेत हे पाहण्यासाठी मी आलो आहे. संकट मोठे असून त्याचा एकीने सामना करावा लागेल, असे राज्यपाल जिष्णू देव वर्मा म्हणाले. राज्यपालांनी आज चाकूर तालुक्यातील आनंदवाडी, नायगाव येथे विविध कामांची पाहणी केली. आनंदवाडी येथील कोरड्या पडलेल्या साठवण तलावाचीही पाहणी केली. त्यानंतर त्यांनी दुष्काळ निवारणासाठी राबवण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला.

Comments are closed.