temple Jewellery : टेंपल ज्वेलरी, इतिहासाबरोबरच अध्यात्माचे प्रतिक
भारत हा देश परंपरा आणि विविध संस्कृतीबरोबरच येथील ऐतिहासिक वास्तु आणि वस्तुंसाठी ओळखला जातो. पण त्याचबरोबर भारतीयांचे दागिणे प्रेम हे देखील जगभरात चर्चिले जाते. त्यातही थेट भारताच्या अध्यात्माशी जोड असलेली टेंपल ज्वेलरी ही नेहमीच दागिणे प्रिय व्यक्तींसाठी उत्सुकतेचा विषय ठरली आहे. आज याच टेंपल ज्वेलरीचा इतिहास आणि त्यामागे दडलेलं अध्यात्माबद्दल आपण जाणून घेवूया.
टेंपल ज्वेलरीची परंपरा दक्षिण भारतात सुमारे ९व्या शतकातील चोल व पांड्य राजवटीपासून सुरू झाल्याचे मानले जाते. त्या काळात देवांच्या मूर्तींना सोन्याचे, चांदीचे आणि मौल्यवान रत्नांनी सजवलेले दागिने परिधान केले जात. हे दागिने अत्यंत कलात्मक आणि सूक्ष्म कोरीव कामाने तयार केले जात होते. लक्ष्मी, सरस्वती, गणेश, आणि इतर देवी-देवतांच्या आकृत्या या दागिन्यांमध्ये कोरल्या जात असत, त्यामुळे त्यांना धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व प्राप्त झाले.
नंतर भारतनाट्यम आणि कुचिपुडी यांसारख्या पारंपरिक नृत्यांमध्येही टेंपल ज्वेलरीचा विशेष वापर होऊ लागला. नृत्यांगना या दागिन्यांद्वारे देवतांचे रूप साकारत आणि त्यातून भक्तीभाव व्यक्त करत असत. त्यामुळे टेंपल ज्वेलरी केवळ अलंकार न राहता सांस्कृतिक आणि धार्मिक अभिव्यक्तीचे माध्यम बनले.
कालांतराने, विशेषतः २०व्या शतकात टेंपल ज्वेलरी सर्वसामान्य महिलांमध्येही लोकप्रिय झाली. लग्नसमारंभ, सण-उत्सव आणि विशेष प्रसंगी हे दागिने परिधान करण्याची परंपरा वाढली. आजही दक्षिण भारतातील ब्राइडल ज्वेलरीमध्ये मंदिर दागिन्यांना विशेष स्थान आहे.
आधुनिक काळात या दागिन्यांमध्ये काही बदल झाले असले तरी त्यांची पारंपरिक रचना आणि देवतांची नक्षी अजूनही टिकून आहे. सोन्याबरोबरच कृत्रिम दागिन्यांच्या स्वरूपातही हे दागिने उपलब्ध आहेत, त्यामुळे ते अधिक लोकांपर्यंत पोहोचले आहेत.
एकंदरीत, टेंपल ज्वेलरी केवळ सौंदर्य वाढवणारा अलंकार नसून भारतीय इतिहास, कला आणि अध्यात्म यांचे सुंदर प्रतीक आहेत.
Comments are closed.