Sugar Control Tips : गोड खाण्याची योग्य वेळ कोणती?
गोड खायला कोणाला आवडत नाही? जेवणानंतरचा गुलाबजाम, दुपारच्या चहासोबत बिस्कीट, स्लाइस केक किंवा कामाच्या ताणात खाल्लेली चॉकलेट क्यूब. गोड पदार्थ आपल्या आनंदाशी जोडले गेले आहेत. पण अनेकदा आपण गोड किती खातो यापेक्षा ते कधी खातो, याकडे फारसं लक्ष देत नाही. याच छोट्याशा चुकीमुळे वजन वाढणं, थकवा जाणवणं आणि ब्लड शुगरमध्ये चढउतार होण्याचा धोका वाढू शकतो. योग्य वेळ आणि योग्य पद्धतीने गोड खाल्ल्यास त्याचा आनंदही घेता येतो आणि आरोग्याचं नुकसानही टाळता येतं
दुपारच्या जेवणांनंतर
गोड पदार्थ हा जेवणाचा छोटासा भाग असावा. जेवणात आधीच प्रोटीन, फायबर आणि इतर पोषक घटक असल्यामुळे गोडातील साखर शरीरात तुलनेने हळूहळू शोषली जाते. त्यामुळे रक्तातील साखरेत अचानक वाढ होण्याची शक्यता कमी होते आणि शरीराला त्याचा ताण कमी सहन करावा लागतो. दुपारच्या जेवणानंतर थोडासा गोड पदार्थ खाणं तुलनेने अधिक योग्य मानलं जातं. कारण त्या वेळेनंतर शरीर सक्रिय असतं. चालणं, काम करणं किंवा इतर हालचालींमुळे मिळालेली ऊर्जा वापरली जाते. त्यामुळे अतिरिक्त कॅलरी साठून राहण्याचा धोका काही प्रमाणात कमी होतो.
उपाशीपोटी गोड खाणं टाळावं
सकाळी रिकाम्या पोटी किंवा बराच वेळ काही न खाल्ल्यानंतर गोड पदार्थ खाल्ल्यास रक्तातील साखर झपाट्याने वाढते. त्यानंतर ती तितक्याच वेगाने खाली येते. यामुळे काही वेळाने पुन्हा भूक लागते, थकवा जाणवतो आणि वारंवार गोड खाण्याची इच्छा निर्माण होते. त्यामुळे गोड खाण्यासाठी उपाशीपोटी वेळ निवडणं योग्य ठरत नाही.
रात्री उशिरा गोड खाणंटाळावं
रात्री जेवण झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात गोड खाण्याची सवय अनेकांना असते. मात्र झोपण्यापूर्वी वारंवार गोड खाल्ल्यास शरीराची ऊर्जा वापरण्याची क्षमता कमी असते. त्यामुळे रक्तातील साखरेवर आणि वजनावर त्याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो. त्यामुळे रात्री गोड खाण्याचं प्रमाण शक्य तितकं मर्यादित ठेवणं चांगलं.
आरोग्याची काळजी घेताना गोड पूर्णपणे टाळण्याची गरज नसते. प्रमाण, वेळ आणि संतुलन या तीन गोष्टी पाळल्या तर आवडते गोड पदार्थही आनंदाने खाता येतात. मात्र मधुमेह, प्रीडायबिटीज, इन्सुलिन रेझिस्टन्स किंवा इतर चयापचयाशी संबंधित समस्या असणाऱ्यांनी गोड खाण्याबाबत डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.
Comments are closed.