पुणे पोलिसांच्या मारणेसोबतच्या मटण पार्टीनंतर आता नाशिकमध्येही पोलिसांची गुन्हेगारांसोबत पार्टी

नाशिक: राज्यात कायद्याचे रक्षक,सामान्यांना न्याय मिळवून देणारे पोलिसच गुन्हेगारांसोबत पार्टी करत असल्याचं दिसून येत आहे. आधी पुण्यातील कुख्यात गुंड गज्या मारणेला पुण्यावरून सांगली कारागृहात नेत असताना एका ढाब्यावरती पोलिसांनी मटण पार्टी केल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर पोलिस आयुक्तांनी त्यांच्यावरती गुन्हा दाखल करत निलंबनाची कारवाई केली होती. ही घटना ताजी असतानाच नाशिकमध्ये देखील अशीच एक घटना समोर आली आहे. वेगवेगळ्या गुन्ह्यातील 2 आरोपींसोबत चक्क पोलिसांचीच पार्टी झाल्याची माहिती समोर आली आहे.

पुणे रोडवर एका हॉटेलात पार्टी सुरू होती

पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकाकडून हॉटेलवर छापा टाकत चार पोलिसांना रंगेहाथ पकडल्याची माहिती समोर आली आहे. रात्री उशिरापर्यंत या चारी पोलीस कर्मचाऱ्यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी केल्याची माहिती आहे. न्यायालयातून सेंट्रल जेलकडे घेऊन जात असताना पुणे रोडवर एका हॉटेलात पार्टी सुरू होती. न्यायालयीन कामकाजासाठी या दोन आरोपींना नाशिकच्या जिल्हा न्यायालयात आणण्यात आले होते. युनिट एकच पथक आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी हॉटेलवर छापा टाकत कारवाई केली. कैद्यांसोबत पोलीस पार्टी करत असल्याची माहिती थेट नाशिक पोलीस आयुक्तांना मिळाली होती. माहिती मिळाल्यानंतर नाशिक पोलीस आयुक्तांनी एका विशेष पथकाला पाठवत या पोलीस कर्मचाऱ्यांना रंगेहाथ पकडल्याची माहिती आहे.

पुणे पोलिसांची गज्या मारणेसोबत मटण पार्टी

पुण्यातील येरवडा कारागृहातून गजा मारणेची रवानगी सांगलीतील कारागृहात करण्यात येत होती. बारा मार्चला त्याला सांगली कारागृहात नेण्याचा निर्णय झाला आणि पुणे पोलिसांचं पथक त्याला सांगलीत घेऊन जाण्यासाठी निघालं. मात्र सांगलीला जात असतानाच सातारा जवळील कणसे धाब्यावर पोलिसांची व्हॅन थांबली. व्हेन थांबल्यावर पोलीस आणि गजा मारणे यांनी मटणाची पार्टी केली. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आणि त्यानंतर याचा सगळा कानोसा पोलीस आयुक्तांना लागला आणि त्यांनी थेट चौकशी केली असता हा सगळा प्रकार समोर आला. पोलिसांनी थेट या पोलिसांवर निलंबनाची कारवाई केली आहे.

पुण्यातील निलंबित करण्यात आलेल्या पोलिसांची नावं

सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरज राजगुरू
पोलीस हवालदार महेश बामगुडे
सचिन मेमाने
पोलीस शिपाई राहुल परदेशी

ही पार्टी इथेच थांबली नाही तर या पार्टी दरम्यान गजा मारणेला दोन फॉर्च्युनर अन् एका थार भेटायला आली आणि यातून गजा मारणेचे सहकारी खाली उतरले… त्यांनी देखील पार्टी केली… यात सतीश शिळीमकर, विशाल धुमाळ आणि बाळकृष्ण उर्फ पांड्या मोहिते हे तिघं होते. मोक्का कारवाईनंतर गजा मारणेला भेटायला आलेले आणि पोलिसांनी बिनधास्त सगळ्यांना भेटू दिलं. यातील विशाल धुमाळवर खूनाचा गुन्हा दाखल आहे, तर पांड्या मोहिते सांगलीत गजा मारणेच्या टोळीचा शूटर आहे. आता या तिघांवरही गुन्हा दाखल करण्यात आलाय.

अधिक पाहा..

Comments are closed.