आयपीएल संपताच क्रिकेटप्रेमींसाठी टी20 मुंबई लीगची मेजवाणी, 100 रुपयांत स्टेडियमवर जाऊन मॅच पाहा
टी 20 मुंबई लीग 2025 बातम्या: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) आज अधिकृतपणे बहुप्रतीक्षित टी20 मुंबई लीग 2025 साठी तिकिट विक्रीची घोषणा केली आहे. ही लीग 4 जून ते 12 जून दरम्यान दोन प्रतिष्ठित मैदानांवर वानखेडे स्टेडियम आणि डीवाय पाटील स्टेडियम येथे आयोजित केली जाणार आहे. तिकिटे डिस्ट्रिक्ट बाय झोमॅटो या संकेतस्थळावर ऑनलाइन उपलब्ध आहेत. लेव्हल 1 साठी किंमत ₹100, लेव्हल 2 साठी ₹300 आणि गारवारे पॅव्हिलियन लेव्हल 2 साठी ₹400 आहे.
टी20 मुंबई लीग भारतातील आघाडीच्या स्थानिक फ्रँचायझी आधारित टी20 स्पर्धांपैकी एक तब्बल सहा वर्षांच्या अंतरानंतर पुनरागमन करत असून, शहरातील सर्वोत्तम क्रिकेटपटूंच्या सहभागामुळे प्रेक्षकांना एक भव्य क्रिकेट पर्व पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांना भारताच्या टी20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, अजिंक्य रहाणे, शिवम दुबे आणि पृथ्वी शॉ यांसारख्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंना खेळताना पाहण्याची संधी मिळणार आहे. सिझन 3 मध्ये मुशीर खान आणि अंगकृष रघुवंशी यांसारखे मुंबईतील उदयोन्मुख स्टार्सदेखील सहभागी होणार आहेत.
तसेच, मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) बीएमसी शाळांमधील विद्यार्थी आणि वंचित मुलांना सामने थेट पाहण्याची संधी देणार आहे, जेणेकरून त्यांना या अनुभवातून प्रेरणा मिळावी आणि मोठी स्वप्ने पाहण्याचा आत्मविश्वास मिळावा.
आठ संघांच्या या स्पर्धेत 23 सामने खेळवले जातील. या संघांमध्ये नॉर्थ मुंबई पँथर्स (होरायझन स्पोर्ट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड), आर्क्स अंधेरी (आर्क्स स्पोर्ट्स अँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड), ट्रायम्फ नाइट्स मुंबई नॉर्थ ईस्ट (ट्रान्सकॉन ट्रायम्फ नाइट्स प्रायव्हेट लिमिटेड), बांद्रा ब्लास्टर्स (पीके स्पोर्ट्स वेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड), ईगल ठाणे स्ट्रायकरस (ईगल इन्फ्रा इंडिया लिमिटेड), आकाश टायगर्स मुंबई वेस्टर्न सबर्ब्स (वर्ल्ड स्टार प्रीमियर लीग एलएलपी), सोबो मुंबई फाल्कन्स (रोडवे सोल्यूशन्स इंडिया इन्फ्रा लिमिटेड) आणि मुंबई साउथ सेंट्रल मराठा रॉयल्स (रॉयल एज स्पोर्ट्स अँड एंटरटेनमेंट) हे संघ स्पर्धा करणार आहेत.
लीग टप्प्यात दररोज चार सामने खेळवले जातील, प्रत्येकी दोन दोन वेगवेगळ्या मैदानांवर. वानखेडे स्टेडियमवर दुपारी 2.30 वाजता आणि संध्याकाळी 7.30 वाजता सामने होणार आहेत, तर डी.वाय. पाटील स्टेडियमवर सकाळी 10.30 वाजता आणि सायंकाळी 5.30 वाजता सामने सुरू होतील. उपांत्य फेरीचे सामने आणि अंतिम सामना वानखेडे स्टेडियमवर अनुक्रमे 10 जून आणि 12 जून रोजी खेळवले जातील.
अधिक पाहा..
Comments are closed.